बेकायदा घरांची खरेदी-विक्री तेजीत! 

सुजित गायकवाड
मंगळवार, 2 एप्रिल 2019

नवी मुंबई - दिघ्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारतर्फे बाजू सावरण्याचे काम सुरू आहे; तर कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असलेल्या रिकाम्या इमारतींवर हातोडा चालवण्याचे काम एमआयडीसीने सुरू केले आहे. अशा परिस्थितीतही दिघ्यातील काही बेकायदा इमारतींतील घरांची राजरोस खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे इमारत बेकायदा असल्याने केव्हाही पाडली जाऊ शकते, याची कल्पना संबंधित खरेदीदाराला आहे. तरीही "सरकारचे धोरण बदलू शकते' या आशेपोटी लाखोंचा काळा व्यवहार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दिघा येथील 99 इमारती बेकायदा असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी 2013 ला मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. इमारतींच्या दर्जाबाबत शंका उपस्थित झाल्याने सर्व 99 इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार सध्या दिघा परिसरात सर्वत्र केव्हाही इमारतींवर हातोडा पडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे भीतीच्या छायेखाली आहेत. त्याचा फायदा काही दलालांनी घेत धनदांडग्यांना घरे विकण्याचा घाट सुरू केला आहे. बिंदूमाधव नगरमधील "अनभुले निवास' या चार मजली इमारतीतील 550 चौरस फुटाच्या पहिल्या आणि चौथ्या मजल्यावरील घरांचा नुकताच होळीच्या मुहूर्तावर सौदा झाला. प्रत्येकी 10 लाखांना दोन घरे एका व्यक्तीने खरेदी केली आहेत. फक्त 100 रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देऊन इमारतीलगतच्या रस्त्यावरच पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

ही घरे बेकायदा असल्याची पूर्ण कल्पना खरेदीदाराला आहे, परंतु सरकारचे धोरण बदलले तर? या एका आशेवर लाखोंचा "जुगार' खेळला जात आहे. दिघ्यातील बिंदुमाधव नगरप्रमाणेच ईश्‍वरनगर, विष्णूनगर आणि गवतेवाडीतील बेकायदा इमारतींपैकी रिकाम्या न केलेल्या इमारतींमध्ये घरांची विक्री सुरू असल्याचे समजते. 

बेकायदा बांधकामांचे पेव 
दिघ्यातील बेकायदा बांधकामांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही अशा बांधकामांचे सत्र थांबलेले नाही. तेव्हापासून आतापर्यंत सिडको आणि एमआयडीसीच्या जागेवर दीड हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे या यंत्रणांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. 

दिघा आणि नजीकच्या परिसरात सिडकोने नोटीस बजावून तोडकाम केलेल्या इमारतींपैकी 85 टक्के इमारतींवर पुनर्बांधणी करून त्यांची विक्री झाली आहे. याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. माझा हा दावा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. 
- राजीव मिश्रा, याचिकाकर्ते 

Web Title: Increasing sale of illegal homes