नगर परिषदेच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर - उद्धव ठाकरे

नगर परिषदेच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर - उद्धव ठाकरे

मुंबई - राज्यात आगामी काळात होणाऱ्या 192 नगर परिषदा आणि 20 नगर पंचायत निवडणुका शिवसेना एकट्याने लढणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आज एकट्याने लढण्याच्या तयारीला लागण्याचे आदेश आमदार, खासदारांना दिले. "भाजप गुंडांना प्रवेश देत असल्याने त्यांच्याबरोबर राहून बदनाम होण्याऐवजी पक्ष वाढविण्यासाठी स्वतंत्र लढूया,' असा निर्णय उद्धव यांनी "मातोश्री'वर झालेल्या बैठकीत जाहीर केला. मात्र, मुंबई-ठाण्यासह काही महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांबाबत शिवसेनेकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही.

शिवसेनेचे मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार-खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक ठाकरे यांच्या "मातोश्री' या निवासस्थानी झाली. या बैठकीत उद्धव यांनी आमदार-खासदारांची मते जाणून घेतली. आगामी निवडणुका एकट्याने लढण्याची मागणी आमदार-खासदारांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत उद्धव यांनीही एकट्याने निवडणूक लढण्याचे आदेश दिले. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र, पुढील काळात मुंबई-ठाण्यासह दहा प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याबाबत, खास करून मुंबई-ठाण्याबाबत शिवसेनेकडून कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नसल्याचे समजते.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने गाफील ठेवून युती तोडली. त्यामुळे भाजप राज्यात अव्वल पक्ष ठरला, अशी खंत उद्धव यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात व्यक्त केली होती. त्यामुळे या वेळी युतीसाठी भाजपच्या मागे न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याचे एका आमदाराने सांगितले, तर याबाबत उद्धव ठाकरेच बोलतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- ओडिशात नवीन पटनाईक यांचा पक्ष संपवण्याचा भाजपने प्रयत्न केला; पण त्यांनी भाजपला अंगावर घेऊन पक्ष वाढवला. आपण कोठे कमी आहोत?
- बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी एवढे गैरव्यवहार केले तरी त्यांनी भाजपला कडवी झुंज दिली. प्रादेशिक पक्षांना गिळणाऱ्या भाजपसोबत कशाला जायचे?
- आपसांतील मतभेद मिटवून निवडणुकीच्या तयारीला लागा. तमिळनाडूत जयललिता तुरुंगात जाऊन आल्या. त्या आता आजारी असतानाही त्यांचा पक्ष अभेद्य आहे.
- भाजप गुंडांना प्रवेश देतोय. त्यांच्याबरोबर आपण का बदनाम व्हायचे?
- स्वतंत्रपणे लढल्यास आपलाच फायदा होणार आहे.

मुंबई-ठाण्याचा चेंडू भाजपच्या कोर्टात
मुंबई-ठाण्यातही युती करू नका, अशी मागणी आमदारांनी केली आहे. एकट्याने लढलो तरी सत्ता खेचून आणू, असे आश्‍वासन या आमदारांनी पक्षप्रमुखांना दिले आहे. मात्र, उद्धव यांनी मुंबई-ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिकांबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपला युती हवी असेल तर ते स्वत:हून चर्चेला येतील. शिवसेनेकडून कोणत्याही चर्चेची सुरवात करायची नाही, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com