अंटार्क्‍टिकावरही भारत आत्मनिर्भर! इंडियन ऑईलकडून भारतीय बनावटीच्या इंधनाची निर्मिती 

समीर सुर्वे
Monday, 18 January 2021

हाडं गोठवणाऱ्या अंटार्क्‍टिका खंडावरील थंडीतही काम करू शकणाऱ्या इंधनाची निर्मिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे.

मुंबई  : हाडं गोठवणाऱ्या अंटार्क्‍टिका खंडावरील थंडीतही काम करू शकणाऱ्या इंधनाची निर्मिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. त्यामुळे अंटार्क्‍टिकावर संशोधनासाठी जाणाऱ्या पथकाला भारतीय बनावटीच्या इंधनाच्या मदतीने काम करता येणार असल्याने अंटार्क्‍टिका खंडावरही भारत आत्मनिर्भर झाला आहे. 
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी गुरमितसिंह आणि नॅशनल सेंटर फॉर पोलर ऍण्ड ओशन रिसर्चचे (एनसीपीओआर) संचालक डॉ. एम. रवीचंद्रन यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. 18) इंधन पाठवण्याचा समारंभ पार पडला. अंटार्क्‍टिका येथे भारताची मैत्री व भारती ही दोन संशोधन केंद्रे आहेत. भारताच्या 40 व्या अंटार्क्‍टिका मोहिमेवर "व्हॅसिली गोलोव्हनीन' हे विशेष जहाज रवाना होत आहे. या मोहिमेवर शास्त्रज्ञ, डॉक्‍टर, अभियंते, तंत्रज्ञ आदींचे 43 जणांचे पथक जात आहे. या पथकातील नॅशनल सेंटर फॉर पोलर ऍण्ड ओशन रिसर्चचे डॉ. योगेश रे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमचे अतुल कुलकर्णी तसेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे रवींद्र मोरे यांना यापूर्वीही अंटार्क्‍टिका मोहिमांचा अनुभव आहे. आतापर्यंत अंटार्क्‍टिका मोहिमांसाठी भारताला परदेशी इंधनावर अवलंबून राहावे लागत होते. दरम्यान, या वेळी गोव्याचे पोस्टमास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी या मोहिमांवरील विशेष पाकिटेही प्रसिद्ध केली. 

आव्हानात्मक मोहीम 
जागतिक हवामानातील बदल, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, पृथ्वीभोवतीचा ओझोनचा घटत असलेला थर तसेच हवेतील घटकांबाबत नॅशनल सेंटर फॉर पोलर ऍण्ड ओशन रिसर्च (एनसीपीओआर) अंटार्क्‍टिकावर संशोधन करत आहे. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही संशोधन मोहीम हाती घेतल्याने ती विशेष आव्हानात्मक आहे. 15 महिन्यांपासून अंटार्क्‍टिकावर असलेल्या भारतीय पथकातील 48 संशोधकांना हे नवे पथक आल्यावर भारतात परत आणले जाणार आहे. 

इंडियन ऑईलने लेहपासून ते अंटार्क्‍टिकापर्यंत अविरत इंधनपुरवठा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वीही इंडियन ऑईलने हिमालयातील उणे 33 अंश सेल्सिअस तापमानात काम करेल, असे बीएस- 6 दर्जाचे विशेष शीतकालीन स्वच्छ हायस्पीड डिझेल तयार करण्याचा बहुमान मिळवला होता. 
- गुरमितसिंह,
वरिष्ठ अधिकारी, इंडियन ऑईल. 

 

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is self sufficient in Antarctica too Production of Indian made fuel from Indian Oil