भारतीय भाषा आणि संस्कृती सर्वात श्रेष्ठ - विठ्ठल कांबळे

संजीत वायंगणकर
सोमवार, 30 एप्रिल 2018

डोंबिवली : सर्वच भारतीय भाषा समृध्द आहेत. त्या नष्ट करण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात परकीयांनी केले. मात्र सध्या ते काम आपणच न्यूनगंडातून करीत आहोत. भारतीय भाषा आणि संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे ती जपण्याची व संवर्धनाची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी केले.

डोंबिवली : सर्वच भारतीय भाषा समृध्द आहेत. त्या नष्ट करण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात परकीयांनी केले. मात्र सध्या ते काम आपणच न्यूनगंडातून करीत आहोत. भारतीय भाषा आणि संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे ती जपण्याची व संवर्धनाची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी केले.

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा यंदाचा  “डोंबिवली सेवा पुरस्कार” आपले सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली ला प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर टिळकनगर अध्यक्ष डॉ. प्रा. शुभदा जोशी, कार्याध्यक्षा सविता टांकसाळे, कार्यवाह डॉ. महेश ठाकूर, आशिर्वाद बोंद्रे, पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे यांना रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डोंबिवली सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी विठ्ठल कांबळे पुढे म्हणाले, मागील अनेक पिढ्या मराठी मातृभाषेतूनच शिकल्या पण इंग्रजी बोलण्याबाबत आत्मविश्वासाच्या अभावाने करियर करताना, त्यांना आलेल्या अनंत अडचणीमुळे आपल्या पाल्यांबाबत पालक वाजवीपेक्षा जास्त सतर्क झाले. त्यांनी पाल्यांना इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरला परंतु आता मराठी माध्यमांच्या शाळांनी काळानरूप बदल करून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. आता फक्त विध्यार्थ्यांना इंग्रजीतून बोलण्याचा आत्मविश्वास देण्याची गरज आहे. पालकवर्गाचा कल मातृभाषेतून शिक्षणाकडे वळत आहे. कोल्हापूर, सांगली साताराच न्हवे, तर मुंबई - सायनच्या डी.एस. हायस्कूल बाबातची उदाहरणे त्यांनी उपस्थितांपुढे ठेवली.

यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी आणि अध्यक्षा सुलभा डोंगरे यांनी सत्काराला उत्तर देताना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने हा पुरस्कार व्यक्ती ऐवजी संस्थेस देण्याचा नवा पायंडा पाडल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. डॉ राजन जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. तर श्रद्धा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: indian languages and culture great said by vitthal kambale