भारतीय शिकवतोय अमेरिकी नागरिकांना मल्लखांब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

मल्लखांबपटू चिन्मय पाटणकर व त्यांच्या सहकार्यामुळे मल्लखांबासारखा मर्दानी खेळ अमेरिकेत चांगलाच रुजला आहे

मुंबई : भारतीय मातीतला मल्लखांब खेळ अमेरिकेतही लोकप्रिय झाला असून त्यासाठी एका भारतीयाचे विशेष प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. मल्लखांबपटू चिन्मय पाटणकर व त्यांच्या सहकार्यामुळे मल्लखांबासारखा मर्दानी खेळ अमेरिकेत चांगलाच रुजला आहे. आता तो इतर देशांतही नेण्याचा पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा मानस आहे.
 
पाटणकर यांनी न्यूजर्सीमधील आपल्या घराबाहेर मल्लखांब रोवून अमेरिकी नागरिकांना 2013 पासून मल्लखांबाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मल्लखांब फेडरेशन ऑफ अमेरिकाची स्थापना केली. मल्लखांबचे रीतसर प्रशिक्षण देणारी अमेरिकेतील ती पहिलीच संस्था आहे. आता कॅनडा व कॅरेबियन देशांमध्ये मल्लखांब नेण्याची त्यांची योजना आहे. अमेरिकेत जुलै 2021 मध्ये दुसऱ्या मल्लखांब विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले आहे. मल्लखांब आंतरराष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत संस्थेने अमेरिकेचा संघही पाठवला आहे.
 
नऊ वर्षांचे असताना चिन्मय यांनी मल्लखांबाची सुरुवात केली. त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहे. पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब अशा तिन्ही प्रकारांत त्यांचे प्रावीण्य आहे. बाळकृष्ण थत्ते आणि विनायक राजमाचिकर त्यांचे गुरू होते. अमेरिकमधील न्यूजर्सीमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपल्या घराबाहेर आणि गॅरेजमध्ये मित्र व कुटुंबियांना मल्लखांब शिकवायला सुरुवात केली. चालत्या ट्रकवर मल्लखांबचे सादरीकरण करण्याची किमया साधणारे ते पहिले भारतीय ठरले. श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या चिन्मय यांनी अमेरिकेतील फॉक्‍स चॅनेलवर स्टीव्ह हार्वेसह मल्लखांबाच्या कसरती दाखविल्या आहेत. 

संयुक्त राष्ट्रात मल्लखांब 
मल्लखांबाचे भारतीय ज्ञान आणि खेळ प्रशिक्षणाचे पाश्‍चिमात्य ज्ञान एकत्र करून मल्लखांबावरील पुस्तक फेडरशनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. फेडरेशनने संयुक्त राष्ट्राच्या आवारात पहिल्यांदा मल्लखांब खेळ दाखवला. न्यूजर्सीमध्ये भारतीय खेळांचा नवीन अभ्यासक्रम फेडरेशनने सुरू केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian man teaches Mallakhamba to American citizens