भारतीय रेल्वे तंत्रज्ञान निर्यात करणार 

Indian Railway
Indian Railway

मुंबई : 'मेक इन इंडिया'अंतर्गत पहिली लोकल सेवेत दाखल झाल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत रेल्वेने तंत्रज्ञान आयात करण्यावर भर दिला होता; पण हे चित्र पूर्ण बदलले आहे. तंत्रज्ञान आयातीचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांवर आणले आहे. यापुढे भारतीय तंत्रज्ञान परदेशात निर्यात करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले. 

भारतीय बनावटीच्या 'मेधा' लोकलबरोबर विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्‌घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये शनिवारी करण्यात आले. एलटीटी-टाटानगर या अंत्योदय एक्‍स्प्रेसला रेल्वेमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही एक्‍स्प्रेस सर्वसाधारण श्रेणीतील प्रवाशांसाठी असून, त्यात कुठलेही आरक्षण नाही. या गाडीला 20 डबे असून, त्यात दोन हजार आसने आहेत. याबरोबर भुसावळ-जळगावदरम्यान चौथ्या मार्गिकेचे भूमिपूजन, मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनसवर 13 हजार चादरी धुण्याची क्षमता असलेली आधुनिक लॉण्ड्री व इतर सुविधांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन करण्यात आले. 

सोलापूर, गुलबर्गा, सुरत, इंदूर व राजकोट स्थानकात वाय-फाय सुविधा व चर्चगेट आणि भुसावळ येथील सौरऊर्जा प्रणालीचे उद्‌घाटनही करण्यात आले. 'सौरऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. एक हजार मेगावॉटचा आराखडा आहे. दहा वर्षात रेल्वेचे वीजबिल 41 हजार कोटींनी कमी होईल,' असे रेल्वेमंत्री प्रभू यांनी या वेळी सांगितले. 

खान्देशला फायदा 
भुसावळ-जळगावदरम्यानच्या 24 किलोमीटरच्या चौथ्या मार्गिकेसाठी 260 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. 'या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ खान्देशला होईल. जवळपास 22 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात प्रगतिपथावर आहेत,' असे रेल्वेमंत्री म्हणाले. नवीन गाड्या सुरू करण्याबाबत सातत्याने सर्वेक्षण करण्यात येते. मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेस हा त्यातीलच एक भाग आहे, असे प्रभू म्हणाले. 

मेधा लोकलची वैशिष्ट्ये

  • चेन्नईतील आयसीएफ फॅक्‍टरीत लोकलची बांधणी. खर्चात 25 टक्के बचत. 
  • परदेशी तंत्रज्ञानासाठी द्याव्या लागणाऱ्या 50 लाखांची बचत. 
  • जीपीएसवर आधारित प्रवासी सूचना यंत्रणा 
  • एलईडी वीज यंत्रणा 
  • चालक व गार्डमधील संभाषणाची सुविधा 
  • वेग ताशी 105 किलोमीटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com