भारताची आरोग्य व्यवस्था अजूनही अशक्त - डॉ. अमर्त्य सेन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

मुंबई - आरोग्यावर होणारा कमी खर्च, नियोजनाचा व नीतिमूल्यांचा अभाव आणि तोकडे वैद्यकीय मनुष्यबळ, यामुळे भारतातील आरोग्य व्यवस्था अजूनही अशक्त आहे, असे निदान नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी शनिवारी (ता. 28) येथे केले.

मुंबई - आरोग्यावर होणारा कमी खर्च, नियोजनाचा व नीतिमूल्यांचा अभाव आणि तोकडे वैद्यकीय मनुष्यबळ, यामुळे भारतातील आरोग्य व्यवस्था अजूनही अशक्त आहे, असे निदान नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी शनिवारी (ता. 28) येथे केले.

"सर्वांसाठी आरोग्य, का आणि कसे' या विषयावर डॉ. सेन यांनी विचार मांडले. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या हिरकमहोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

आशियातील छोट्या देशांनाही आरोग्याच्या सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले असताना, भारत मात्र या बाबतीत मागे पडला आहे. काही वर्षांत भारतातील दरडोई उत्पन्न वाढले आहे. मात्र, सामाजिक निर्देशांकांमध्ये भारत मागे आहे. सामाजिक निर्देशांकांमध्ये भारतापेक्षा दरडोई उत्पन्न कमी असलेले श्रीलंका, बांगलादेश आणि भूतान पुढे आहेत. आरोग्य ही मानवतेशी निगडित बाब आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सल्लाही डॉ. सेन यांनी दिला.

डॉ. सेन यांनी आरोग्य यंत्रणेतील खासगीकरणावरही ताशेरे ओढले. "भारतात आरोग्य यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले खासगीकरण धोक्‍याचे आहे. आरोग्य यंत्रणेत असलेल्या अडचणी आणि त्रुटींवर खासगीकरण हे उत्तर नाही. प्राथमिक आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्‍यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातच रुग्णाला चांगल्या सेवा-सुविधा मिळाल्या तर पुढे मोठ्या रुग्णालयात होणारा खर्च वाचेल. परिणामी आरोग्य सुविधांवर होणारा खर्चही कमी होईल, असे मतही डॉ. सेन यांनी नोंदवले. भारतात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्‍टर आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

अत्यावश्‍यक उपचारांसाठी सबसिडी देणे, राष्ट्रीय सुरक्षा बिमा यांसारख्या योजनांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्‍यकता आहे. तैवान, जपान, चीन, अमेरिका, मेक्‍सिको आदी देशांतील राज्य सरकारे अशी सबसिडी देतात. त्यामुळे तेथील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारल्याचे डॉ. सेन यांनी सांगितले. नागरिकांनी चांगल्या आरोग्य सेवेचा आग्रह धरला पाहिजे, तरच आरोग्य यंत्रणेत सुधारणा होईल, असे ते म्हणाले.

माध्यमांचेही दुर्लक्ष
आरोग्यसेवेकडे माध्यमेही फारसे लक्ष देत नसल्याची खंत डॉ. सेन यांनी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी केलेल्या अभ्यासाचा दाखला देत ते म्हणाले, संपादकीय पानावर आरोग्यविषयक माहितीचे प्रमाण अवघे एक टक्का आहे.

"नोटाबंदीचे मिसाईल सुटलेय, पण ते कुठे पडले आहे, कोणालाच सांगता येणार नाही', अशा शब्दांत त्यांनी नोटाबंदीवर टीका केली.

Web Title: India's health system is still weak