
Mumbai News : कुर्ल्याची उद्योगांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव; काँग्रेसचा आरोप
मुंबई : कुर्ला-कमानी भागातील साठ वर्षे जुन्या उद्योग गाळ्यांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे कारस्थान स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या साह्याने केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
हा विषय आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. काळे मार्गावरील भारत कोल कंपाऊंड येथील शंभर लघुद्योग गाळ्यांमध्ये साडेचार हजार कामगार काम करीत असून त्यावर त्यांच्या वीस हजार कुटुंबियांचा उदरनिर्वाह होतो.
ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी स्थानिक महापालिका व पोलिस अधिकारी संगनमताने त्या गाळेधारकांवर दबाव आणीत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला. राज्य सरकारने या कामगार आणि उद्योजकांना वाचवावे आणि पालिकेचे भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी पटोले यांनी विधानसभेत केली.
जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकार अनेक योजनांची घोषणा करते. परंतु दुर्दैवाने सरकारी अधिकारी आणि सरकारी उच्चपदस्थांशी संबंधित बिल्डर यांनी हे उद्योग बंद करून जागा बिल्डरला देण्याचा डाव आखला आहे, असाही आरोप त्यांनी केला.
तर गेल्या आठवड्यात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली चार ते पाच हजार कामगारांनी निषेध मोर्चा काढून ‘उद्योग बचाव-कामगार बचाव’ सभा घेतली. बिल्डरशी करार करा नाहीतर तुमच्यावर कठोर कार्यवाही होईल अशी धमकी महापालिकेचे अधिकारी देत असल्याचा आरोप नसीम खान यांनी यावेळी केला.
शिंदे सरकारने अशा छोट्या-मोठ्या उद्योजकांना व हजारो कामगारांना त्वरित संरक्षण द्यावे आणि महापालिका अधिकारी व साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.