सरकारच्या विरोधात हक्कभंग मांडणार - विखे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

मुंबई - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल राज्य सरकारच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी (ता. 5) शिर्डीत दिली.

विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरवात आज विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार घोषणांचा पाऊस पाडणारे आणि स्वप्नांची मालिका दाखवणारे आहे. सभागृहात दिलेली आश्वासने न पाळल्याने सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे, ते दिसते, असे विखे-पाटील म्हणाले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. या माहितीचा हवाला देत विखे-पाटील म्हणाले, अर्थसंकल्पी अधिवेशनात 13 मार्च 2015 रोजी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सूतोवाच केले होते. एक लाख रुपयांच्या मदतीत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करून त्याची लगेच अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन खडसे यांनी दिले होते. मात्र सरकारचे हे आश्वासन पोकळ ठरले. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Web Title: infringement claims against the government