ठाण्यात ईव्हीएम मशीनवर शाईफेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता ताब्यात

ठाणे : ईव्हीएम मशीनला विरोध करण्याच्या प्रयत्नात थेट ईव्हीएम मशीनवरच शाई फेकण्याचा प्रकार ठाण्यात घडला. याप्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुनील खांबे यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तक्रार आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र, या गोंधळामुळे सुमारे अर्धा तास या मतदान केंद्रातील मतदान थांबविण्यात आले होते.

ठाणे विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेले सुनील खांबे मतदान करण्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालया शेजारील मतदान केंद्रात मतदानासाठी गेले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातून बाहेर पडण्याऐवजी आपल्याजवळील शाईच्या बाटलीमधील शाई थेट ईव्हीएम मशीनवर फेकली. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी ईव्हीएम मशीनविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ईव्हीएम मशीनचा वापर तत्काळ बंद करा, अशा घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात होत्या.

त्यामुळे या मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. निवडणूक कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती बंदोबस्तावरील पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ खांबे यांना ताब्यात घेतले. मात्र हा सारा प्रकार सुमारे पंधरा ते वीस मिनिटे सुरू होता. खांबे यांना मतदान केंद्रातून बाहेर काढून थेट ठाणे नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

पोलिसांनी खांबे यांना ताब्यात घेतले असले तरी सायंकाळपर्यंत त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मतदानाचे कामकाज संपल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर पुढील गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ink throughn on an EVM machine in Thane