आभासी चलनप्रकरणी राज कुंद्रा यांची चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आठ तास चौकशी केली. पुण्यातील आभासी चलनप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आठ तास चौकशी केली. पुण्यातील आभासी चलनप्रकरणी ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

संशयित व्यवहारांबाबतची माहिती मिळाल्यानंतर "ईडी'ने संशयावरून कुंद्रा यांना समन्स पाठवले होते. समन्स पाठविल्यानंतर कुंद्रा यांनी सकाळी ईडीच्या झोन-2 च्या कार्यालयाला भेट दिली. त्याच्यावर मनी लॉण्डरिंग केल्याचा संशय आहे. पुण्यातील गेम बिटकॉईन प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याच्यामार्फत कुंद्राने बिटकॉईन खरेदी केल्याचा संशय आहे. कुंद्रा यांच्या सहभागाबाबत "ईडी'ने ही चौकशी केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेम बिटकॉईनचा अनेक बॉलिवूड तारकांनी प्रचार केला होता. त्याबाबतच्या चित्रफिती ईडीच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात काही बॉलिवूड सेलिब्रिटींची नावेही पुढे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित भारद्वाज आणि त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यांनी आठ हजार गुंतवणूकदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जून 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत ही फसवणूक झाली होती. पाच एप्रिलला पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणी भादंवि कलम 406, 420, 409, 120(ब); तसेच महाराष्ट्र प्रोटेक्‍शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर (एमपीआयडी) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Inquiries by Raj Kundra on virtual challan