मुख्यमंत्री ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी

File Photo
File Photo

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुटी पूर्णाकृती पुतळा येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील चौकात उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री क्‍लब येथे जाऊन बाळासाहेबांच्या ब्राँझ धातूच्या ९ फुटी पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली, या पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून त्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

कलानगर येथील सुप्रसिद्ध वास्तुशिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला असून तो उभारताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही तांत्रिक गोष्टींवर सूचना केल्याचे वडके यांनी सांगितले. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा हा पुतळा उभारला जाणार आहे.

त्यासाठी २ फूट उंच हिरवळ (लॅंडस्केप)सह, ११ फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे. बाळासाहेबांची येत्या २३ जानेवारीला ९४वी जयंती असून त्याच दिवशी बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर महाराष्ट्र पुरातत्त्व समितीनेही मंजूर केला. मात्र मुंबई अर्बन आर्टस्‌ कमिशन यांच्याकडून अद्याप पुतळा बसवण्यासाठी होकार आलेला नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभेला आल्यावर जनसमुदायाला संबोधतानाचे भाव आणणे, हे सर्वांत मोठे कठीण काम आहे. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तिमत्त्व आहेत, त्यामुळे त्यांचा हुबेहूब पुतळा उभा करणे हे एक आव्हान होते. हा पुतळा साकारणे म्हणजे एकप्रकारे शिवधनुष्यच पेलायचे होते.
- शशिकांत वडके,
वास्तुशिल्पकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com