लंकेची उपमा हा ठाण्याचा अपमान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - निवडणुकीसाठी आयात केलेल्या गुंडांना बिभीषणाची उपमा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे ठाण्याला रावणाच्या लंकेची उपमा दिली आहे. हा ठाणेकरांचा अपमान आहे. येथील मतदारच भाजपला धडा शिकवतील, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. 

ठाणे - निवडणुकीसाठी आयात केलेल्या गुंडांना बिभीषणाची उपमा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे ठाण्याला रावणाच्या लंकेची उपमा दिली आहे. हा ठाणेकरांचा अपमान आहे. येथील मतदारच भाजपला धडा शिकवतील, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. 

मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील प्रचारसभा संपल्यानंतर त्यातील टीकेला शिंदे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. आता आनंद दिघे यांची शिवसेना राहिलेली नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांचाही अपमान केला आहे. मुख्यमंत्र्यांना रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांसारख्या भाजप नेत्यांची आठवण झाली नाही. त्यांना दिघे यांचेच नाव घ्यावे लागले, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. 

फडणवीस यांनी रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आयारामांमुळे जुन्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर फुंकर मारण्याच्या नादात ठाण्याला रावणाच्या लंकेची उपमा दिली. याचाच अर्थ ठाण्यातील रहिवासी राक्षस आहेत, असे मुख्यमंत्र्यांना म्हणावयाचे आहे का, असा सवाल शिंदे यांनी केला. बाळासाहेबांचा आणीबाणीला पाठिंबा नव्हता, तर शिस्तबद्ध राष्ट्रवादाला पाठिंबा होता. मात्र आणीबाणीबाबत खोटा इतिहास सांगून मुख्यमंत्री ठाणेकरांची दिशाभूल करत आहेत. गुंडशाहीला जशास तसे उत्तर द्या, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे आपल्याच पोलिसांवर अविश्‍वास दाखवत ठाण्यात गुंडगिरीला प्रोत्साहन दिले आहे. याचसाठी पक्षात गुंडांची भरती केली आहे का, असा सवालही शिंदे यांनी केला. 

खंडणीखोर उमेदवाराच्या प्रभागात सभा 

पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराचा टेंबा मिरविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सभेसाठी खंडणीखोर उमेदवार नारायण पवार यांच्याच प्रभागाची आठवण कशी झाली, असा प्रश्‍नही शिंदे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशांवरूनच ठाणे पोलिसांनी पवार याच्याविरोधात पूर्वी ते कॉंग्रेसमध्ये असताना खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. पाटसकर नावाच्या बांधकाम व्यावसायिकाकडे पवार यांनी खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावरूनच मुख्यमंत्री कार्यालयाने ठाणे पोलिसांना पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या सभेत बिल्डरांना ब्लॅकमेल करणे हा इथल्या नगरसेवकांचा धंदा असल्याचे वक्तव्य केले. मग ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, असा उमेदवार तुम्हाला व्यासपीठावर कसा चालतो, असा सवालही शिंदे यांनी केला.

Web Title: Insult thane