गोविंदांच्या विम्याला राजकीय कवच 

गोविंदांच्या विम्याला राजकीय कवच 

मुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण आणि दक्षिण-मध्य मुंबईतील लोकप्रतिनिधींनी गोविंदा पथकांना विमा काढण्यास आर्थिक साह्य करण्यास सुरुवात केली आहे. 

दहिकाल्यात गोविंदांना होणाऱ्या दुखापती लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी विमा काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. इंडियन ओरिएंटल इन्शुरन्समार्फत प्रत्येक गोविंदामागे 75 रुपयांच्या प्रिमियमला 10 लाखांपर्यंतचा विमा दिला जातो. मुंबईपाठोपाठ वसई-विरारमधूनही विमा काढण्यासाठी या कंपनीकडे विचारणा केली जात आहे. काही मोठी गोविंद पथके सोडली तर अनेक गोविंदा पथकांकडे पैसे नसल्याने ते विमा काढत नव्हते; मात्र विमा काढला नाही तर पथकावर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या पथकांची कोंडी झाली होती. पुढील काही महिन्यांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकारण्यांनी आतापासूनच मैदान तयार करण्यास सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधींनी गोविंदांना विमा काढून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी वरळी परिसरातील गरजू गोविंदा पथकांना विमा काढून देण्याची तयारी दाखवली आहे. नायगाव परिसरातील 10 ते 12 पथकांना आमदार कालिदास कोळंबकर विमा काढून देत आहेत. महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भायखळा परिसरातील सर्व गोविंदा पथकांची जबाबदारी घेतली आहे. 

पूर्वी 100 रुपये असलेला प्रीमियम 75 रुपये करण्यात आला आहे. मागील वर्षी 389 पथकांनी विमा काढला होता. आतापर्यंत मुंबईतील 50 पथकांनी विमा काढला आहे. वसई-विरार परिसरातील 80 ते 100 मंडळांकडून नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. 
- सचिन खानविलकर, इंडियन ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी 

एखादा गोविंदा जखमी झाल्यास त्याला उपचार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सहकार्य करतात. त्याचप्रमाणे ज्या गोविंदांना विमा काढणे शक्‍य होत नाही, त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. जखमी गोविंदाच्या उपचाराबाबत समन्वय समिती विशेष लक्ष देते. 
- बाळा पडेलकर, अध्यक्ष, गोविंदा समन्वय समिती 

असे मिळते संरक्षण 
अपघाती मृत्यू, दोन अवय किंवा डोळे गमावल्यास- 10 लाख 
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास- 10 लाख 
एक अवयव गमावल्यास- पाच लाख 
अपघात झाल्यास- रुग्णालयातील खर्च एक लाखापर्यंत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com