"महा' वादळाची तीव्रता वाढली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पालघर, ठाण्यात उद्या मुसळधार 

मुंबई : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या महावादळाची तीव्रता वाढली असून बुधवारी वादळाच्या प्रभावामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. 

अरबी समुद्रात असलेले हे वादळ 7 नोव्हेंबरपर्यंत दिव ते गुजरातच्या पोरबंदरदरम्यानच्या किनाऱ्यांवर धडकण्याची शक्‍यता आहे. हे वादळ थेट मध्य प्रदेशपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे पुढील आठवडाभर अरबी समुद्र खवळलेला राहणार आहे. किनाऱ्यावर वादळ धडकताना वाऱ्याचा वेग ताशी 120 कि.मी.पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे; तर मंगळवारी अरबी समुद्रात ताशी 190 कि.मी.च्या वेगाने वारे वाहतील. 

गुजरातच्या किनाऱ्यावर वादळ पोहचताना त्याचा प्रभाव उत्तर कोकणातील समुद्रावर दिसणार आहे. खास करून ठाणे आणि पालघरच्या किनाऱ्यांवर त्याचा फटका बसणार आहे. बुधवारी किनाऱ्यांवरील वाऱ्याचा वेग ताशी 70 कि.मी.हून अधिक वेगाने वाहण्याची शक्‍यता आहे. ठाणे, पालघरसह या वादळामुळे धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतील काही भागांत बुधवारी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. 

या वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात वेगवान वारे वाहत असल्याने महामुंबईतील तापमान कमी होऊ लागले आहे. मुंबईतील कुलाबा येथे कमाल 32.8 आणि किमान 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर सांताक्रूझ येथे 32.9 कमाल आणि किमान 23.6 अंश तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवस तापमान याच पद्धतीने राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intensity of storm increased