घड्याळाला घेरले घर कलहाने

घड्याळाला घेरले  घर कलहाने

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक फारशी कुणाला ऐकू येत नाही, ऐकू येतो तो अंतर्गत सत्तासंघर्षाचा कोलाहल... 

पक्षांतर्गत कलह आणि पक्षाची मुंबईत मर्यादित राहिलेली ताकद या गोष्टींमुळे या वेळची मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसची परीक्षा पाहणारी असेल. मुंबई महापालिकेत असलेले पक्षाचे सध्याचे सात हे संख्याबळ तरी या पक्षाला टिकवता येईल का, असा प्रश्‍न आहे.    

राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईकडे म्हणावे तेवढे लक्ष दिलेले नाही. यापूर्वीची महापालिका निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्या उमेदवारांना समर्थन देत आणि काही प्रभागांत इतर पक्षांना पाठिंबा देत लढवली. त्यामुळे या पक्षाला स्वतंत्रपणे सर्व जागा लढवण्याचे आव्हान पेलणे कठीण जाणार आहे. 

पक्षाच्या मुंबई अध्यक्षांनी शहर-उपनगरातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. संजय दिना पाटील यांनी काही काळ मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त झाल्यानंतर ही जबाबदारी सचिन अहिर यांच्यावर आली. त्याच्याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येते. 

अहिर यांच्याच काळात पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आला. नवाब मलिक आणि संजय पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या भांडणात पक्षाची बदनामी झाली. काही दिवसांपूर्वी अजित रावराणे यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत असल्याचे लक्षात आल्यावर विद्या चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. हा पक्षांतर्गत संघर्ष केवळ उमेदवारीवरून उफाळला होता. उमेदवारीवरून वाद चव्हाट्यावर येणे स्वाभाविक, परंतु ‘गद्दारांना हटवा, राष्ट्रवादीला वाचवा’ अशा घोषणांमुळे कार्यकर्त्यांचा नेत्यांवर विश्वास नसल्याचे चित्र उभे राहिले. 

एकीकडे काँग्रेसला समविचारी पक्ष म्हणून जवळ करणे आणि दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवारांना शक्‍य ती मदत करणे, ही राष्ट्रवादीची मुंबईतील खेळी होती. राष्ट्रवादीला कधीच मुंबई महापालिकेत सत्ताधारी होण्याचे स्वप्न पडले नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये गुप्त तह झाल्याची चर्चा त्या वेळी जोरात होती. यंदा त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

काँग्रेसला डावलून उमेदवार जाहीर करून काँग्रेसवर मानसिक दबाव टाकण्याचा राष्ट्रवादीचा बेत होता. तोही फसला आहे. काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. आता पक्षाकडे एकला चलोशिवाय पर्याय नाही. म्हणूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेने प्रचाराला सुरुवात करण्यात आली. मुळातच राष्ट्रवादीचा मुंबईतील पाया डळमळीत आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षाला किती लाभदायक ठरेल, याविषयी शंका आहे. 

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही स्वतःच्या प्रभागाबाहेर फारसा विचार केलेला नाही. सभागृहातील चर्चांमध्येही त्यांनी मुंबईचे प्रश्‍न फारसे मांडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक असण्याचा पक्षाला फायदा होईल, अशा भाबड्या आशेवर नेत्यांना विसंबता येणार नाही. संख्याबळ वाढवण्यापेक्षा असलेले टिकवण्यासाठी पक्षाला रणनीती आखावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com