पक्षांतर हा मतदारांशी धोका : जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

अलिबाग : लाट असलेल्या पक्षांत जाणे म्हणजे मतदारांना धोका देण्यासारखे आहे. जी मंडळी अशी पक्षांतरे करीत आहेत, त्यांनी विचार मंथन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पक्षाच्या 72 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

ब्रिटीशांच्या जोखडातून देश स्वातंत्र्य होत असताना बहुजनांची होणारी गळचेपी दूर करण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित झालेला एक मोठा वर्ग संघर्ष करीत होता. त्यातूनच शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर दाभाडी येथील पहिल्याच अधिवेशनात पक्षाच्या धोरणाला कलाटणी मिळाली. त्यावेळी जातीय राजकारणाला विरोध करत मार्क्‍सवादाचा अंगीकार करण्यात आला. याचवेळेस शेतीमालाला आधारभूत दर मिळाले पाहिजेत, ही मागणी करण्यात आली होती. आजही अशीच परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले. 

कुळ कायदा, कामगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न गेल्या 70 वर्षापासून शेतकरी कामगार पक्ष मांडत आलेला आहे. तेच प्रश्‍न आताचेही राजकीय पक्ष नव्याने मांडत आहेत. त्यावेळच्या शेतकरी कामागार पक्षाच्या नेतेमंडळींनी पुरोगामी विचारांचा अंगीकार केला होता. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणाऱ्या विचारधारेमुळेच शेतकरी कामागार पक्ष आजही कार्यरत आहे, असा दावा त्यांनी केला. 

सध्याच्या परिस्थितीत होणारी पक्षांतरे एका विशिष्ट विचारधारेच्या आहारी जात आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ते अद्यापही या पडझडीत स्थिर आहेत, हेच हे शेतकरी कामागार पक्षाचे यश आहे. देशाला खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांची आज गरज आहे. मध्यंतरी पक्षाने काही तडजोडी केल्या. परंतु, डाव्या विचारसरणीपासून पक्षाने कधीही फारकत घेतलेली नाही. 1990 पर्यंत शेकाप हा प्रमुख पक्ष होता. यानंतर कॉंग्रेसचे, तर आता भाजपाचे प्राबल्य दिसून येत आहे. कॉंग्रेसची पडझड झाली तशीच पडझड भविष्य काळात धार्मिक पक्षांचीही होणार आहे. अशाही परिस्थितीत शेकापसाठी पुढील दिवस आपले वेगळे अस्तित्व दाखविण्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. शेकापचे प्राबल्य असणारे मराठवाडा, विदर्भ, कोकण परिसरात शेकापसाठी पोषक वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले. 
शहरी मतदारांमधून शेकाप दूर जात असल्याची टीका कायम केली जाते. यासाठी शहरी भागात मोठ्या हिमतीने काम करण्याची गरज आहे. शेकापने बदलत्या परिस्थितीत सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. बदलत्या काळानुसार रोजगार निर्मितीसाठी प्राधान्य देण्यात आले. सत्ताधाऱ्यांचे चुकीचे निर्णय दाखवण्यातही शेकापने कधीही प्रतारणा केलेली नाही. जे निर्णय सामान्य लोकांच्या विरोधात असतील त्यापासून त्यांचे नुकसान होणार असेल, अशा वेळेस शेकापने आंदोलने केलेली आहेत. आजही त्याच जोमाने झोकून देणारे कार्यकर्ते असल्याने या क्षेत्रातील शेकापचे वर्चस्व वाढत चाललेले आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

शेकापशी बांधिलकी जपणारे हजारो कार्यकर्ते आहेत. ही बांधिलकी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक पक्ष आले आणि त्यांची अस्तित्वही नाहिशी झाली. यातील अनेक नेत्यांनी इतर पक्षामध्ये कधी सत्ता, तर कधी पदासाठी पक्षांतरे केली; परंतु यांचेही अस्तित्व बदलत्या परिस्थितीत कमी होत गेले. या नेत्यांनी कोणत्याही विचारधारेशी एकनिष्ठता दाखविलेली नाही. ज्या पक्षाची लाट असेल त्या पक्षामध्ये जाणे मतदारांना धोका देण्यासारखे आहे. जी मंडळी अशी पक्षांतरे करीत आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने विचार मंथन करण्याची गरज आहे. आणीबाणीच्या कालावधीतही अशीच पक्षांतरे झाली होती; परंतु शेकापचे अस्तित्व कायम राहिले, ते राहणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 


स्वातंत्र्यासाठी कामगार, शेतकरी, मध्यमवर्ग, तरुणांनी आपले योगदान दिले; तेव्हा कॉंग्रेस पक्ष ही एक राष्ट्रीय चळवळ होती. सत्तांतराचा लाभ समान्य जनतेला मिळावा, अशी धारणा कॉंग्रेसमधील डाव्या विचाराच्या नेत्यांमध्ये पक्की धारणा झाली होती. म्हणूनच 2 ऑगस्ट 1948 रोजी देवाची आळंदी येथील सभेत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.

स्थापना झालेल्या शेका पक्षात ना. ना. पाटील, दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, भाई बंदरकर, कृष्णराव धुळूप, केशवराव धोडगे, विठ्ठलराव हांडे, ऍड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील अशा तेवढ्याच ताकदीच्या प्रगल्भ कार्यकर्त्यांची फळी होती. या पक्षामध्ये असलेल्या नेत्यांमध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांवर मार्क्‍सवादी विचारांचा प्रभाव होता. आजही हा प्रभाव तरुण कार्यकर्त्यांमध्ये वाढत आहे. याचमुळे आंदोलने, मोर्चे यासाठी शेकापने दिलेल्या एका हाकेमुळे हजारो कार्यकर्ते एकत्र येतात. ही खरी शेकापची ताकद आहे.

पक्ष लहान असला तरी त्याची विचारधारा खूप मोठी आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी या पक्षाने अंगिकारलेल्या विचारांची तरुण पिढीने प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com