आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रात आलेल्या पूराचा फटका महाविद्यालयीन प्रवेशांना देखील बसला असून आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील पूरस्थितीचा फटका विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेलाही बसला आहे. पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा संस्थांमध्ये जाऊन प्रवेश घेणे अडचणीचे झाल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) चौथ्या फेरीला आणि समुपदेशन फेरीतील प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील पूरस्थितीमुळे चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करण्यात अडचण येत आहे. चौथ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 13 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते; परंतु पूरस्थितीमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे; तर 17 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. समुपदेशन फेरी 18 व 19 ऑगस्टला होईल आणि त्याची गुणवत्ता यादी 19 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

समुपदेशन फेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ते 23 ऑगस्टपर्यंत संस्थेत जाऊन आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. समुपदेशन फेरीनंतर शिल्लक जागांचा तपशील 24 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI admission process Extended