जांभूळपाड्यात त्या रात्रीत होत्याचे नव्हते...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पूर ओसरल्यावर रस्त्याच्या कडेला मृतदेहांचा सडा पडलेला होता. चिखलातून कोणाचा हात, पाय; तर कोणाचे डोके वर आलेले होते. सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. घरे कोसळत होती. रस्त्या-रस्त्यावर आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. गावकऱ्यांनी मिळून सर्व मृतदेह हायस्कूलमध्ये एकत्र आणले. 

मुंबई : २३ जुलैला संध्याकाळी बायकोच्या मुंबईतील माहेरहून आम्ही सर्व जण घरी आलो. अंबा नदीला फारसे पाणी नव्हते. रात्री अडीच वाजता बघतो तर घरात पाच फूट पाणी होते. आई, भाची (पाचवीत), मुलगा (अडीच वर्षांचा) आणि पत्नी सगळे गोंधळून गेलो. अवघ्या काही मिनिटांतच पाणी आठ-नऊ फूट वाढले. बायकोचा हात हातातून निसटला आणि ती डोळ्यासमोर  वाहून गेली. मुलगा आणि मी झाडाला अडकलो म्हणून बचावलो. बरोबर ३० वर्षांपूर्वी २३ जुलैच्या रात्री रायगड जिल्ह्यातील अंबा नदीला आलेल्या महापुराच्या कटू आठवणी सांगताना निवृत्त शिक्षक जे. बी. पाटील यांच्या डोळ्यात पाणी तरारले.

नदीच्या पुराने सुधागड तालुक्‍यातील जांभूळपाड्याचे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे भरले संसार उद्‌ध्वस्त झाले. या आस्मानी संकटाच्या कटू आठवणी सांगताना प्रत्येकाचाच कंठ दाटून आला. कुणाची आई दुरावली; तर कुणाचा पोटचा गोळा. त्यामुळे ३० वर्षांनंतरही ही घटना कुणीही विसरला नाही. 

जे. बी. पाटील यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी गावातील बबन घरत आणि गावकऱ्यांनी झाडावरून काढले म्हणून आम्ही बाप-लेक बचावलो. आई, भाची आणि बायको गेले या विचारातच घराकडे धाव घेतली; तर आई आणि भाची ओट्याच्या खिडकीला धरून राहिल्या होत्या. 

त्या बचावल्या; पण सहचारिणी गेली. तिच्याबरोबर पोटातील आठ महिन्यांचे बाळही गेले. 
महादू काळभोर यांच्यावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. त्यांचे ९ स्वकीय गेले. त्यांच्या भावाची बायको, भावाच्या तीन मुली, भावाची सून आणि दोन लहानग्या नाती आणि काका-काकू या सर्वांना पुराने गिळले. त्याचबरोबर त्यांच्या तीन म्हशी, दोन बैल, एक गाय, वाडा आणि घर महापुरात वाहून गेले. त्यांच्या वहिनीचा मृतदेह पेरकुटात अडकला होता. त्याच्या बाजूलाच वहिणीची लहान मुलगी एका भल्या-मोठ्या अजगरावर पाय ठेवून सुखरूप उभी होती. त्यानंतरही धैर्याने पुढे गेलेल्या महादू यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले आहे.

भास्कर मोरेश्वर शेळके यांचा भाऊ तुकाराम आणि भावाचा मुलगा असे दोघे जण या पुरात गेले. भावाच्या मुलीला ताप आल्याने ती भास्कर यांच्या घरी आली होती. त्यामुळे ती वाचली. सकाळी भास्कर यांचे सर्व कुटुंब तुकाराम यांच्या घरी गेले. त्याचे सर्व घर जोत्यासह वाहून गेले होते. हे बघून सर्वांचे हातपाय गळाले. 

दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या भावाचा आणि त्याच्या धाकट्या मुलाचा मृतदेह वऱ्हाड गावाजवळ चिखलात अडकलेला आढळला; पण वहिनीचा मृतदेह काही मिळाला नाही. भावाचा मोठा मुलगा सचिन झाडावर सुखरूप होता. शिक्षक दामू माळी गुरुजींच्या तीन मुली पुरात वाहून गेल्या.

विदारक आणि भयाण     
पूर ओसरल्यावर रस्त्याच्या कडेला मृतदेहांचा सडा पडलेला होता. चिखलातून कोणाचा हात, पाय; तर कोणाचे डोके वर आलेले होते. सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. घरे कोसळत होती. रस्त्या-रस्त्यावर आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. गावकऱ्यांनी मिळून सर्व मृतदेह हायस्कूलमध्ये एकत्र आणले. 
महापूरग्रस्तांचे जांभूळपाडा गावाच्या शेजारी असलेल्या वऱ्हाड, विजयनगर अशा गावांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. सरकारदरबारी मृतांचा आकडा ८० असला, तरी वास्तवात शेकडो लोकांना जीव गमवायला लागला. पुराचा फटका पाली आणि इतर गावांनाही बसला होता. अनेकांचे पुनर्वसन झाले नाही.

महापुरातील मृतांना श्रद्धांजली
पाली : सुधागड तालुक्‍यातील जांभूळपाडा अंबा नदीला २३ जुलै १९८९ रोजीच्या मध्यरात्री महापूर आला. या महाप्रलयाला ३० वर्षे पूर्ण झाली. या दिवसाच्या कटू आठवणी जागवत आज नागरिक, प्रशासन, पोलिस अधिकारी आणि मान्यवरांनी जांभूळपाड्यातील स्मृती स्तंभाजवळ मृतांना श्रद्धांजली वाहिली.जांभूळपाड्याच्या सरपंच श्रद्धा कानडे यांनी प्रथम श्रद्धांजली वाहिली. महापुरात अनेकांनी आपली बायको, मुले, भाऊ, वहिनी, भाचा अशी जिव्हाळ्याची माणसे गमावली. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले.या वेळी उपसरपंच राजेश शिंगाडे, सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, माजी सभापती भारती शेळके, भास्कर शेळके, माजी सरपंच मिलिंद बहाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जोरकर, जे. बी. पाटील, हरिश्‍चंद्र पाटील, डॉ. दांडेकर, गणेश शिंदे, अतिष खंडागळे, रवींद्र खंडागळे, मिलिंद शिंदे उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jambhulpada Flood