उल्हासनगरात अनधिकृत बांधकामांवर जेसीबी; पालिकेची कारवाई

दिनेश गोगी
शुक्रवार, 29 मार्च 2019

उल्हासनगरातील बांधकामधारकांनी अनधिकृत बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला होता. आज अधिकाऱ्यांनी अशा 6 बड्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी मशिन चालवल्याने बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.

उल्हासनगर : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आणि आचारसंहिता लागल्याने अधिकाऱ्यांच्या नेमणुका निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध शहरात लागल्यावर त्याचा गैरफायदा घेणाऱ्या उल्हासनगरातील बांधकामधारकांनी अनधिकृत बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला होता. आज अधिकाऱ्यांनी अशा 6 बड्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी मशिन चालवल्याने बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.

उल्हासनगरात निवडणुकीच्या काळात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याची पुराव्यानिशीची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. सर्व अधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध शहरात नेमणुका झाल्याने आपल्या बांधकामांवर कारवाई होणार नाही, असा गैरसमज बांधकामधारकांचा झाला असतानाच आज आयुक्त अच्युत हांगे यांनी अधिकाऱ्यांना या बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्तांचे आदेश येताच उल्हासनगर पालिकेचे अनधिकृत बांधकामविरोधी पथकप्रमुख तथा सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,अजित गोवारी,भगवान कुमावत,शामसिंह,बाजीराव बनकर आदींनी बॅरेक नंबर 52,165, भिमनगर, शिवशक्ती मंदिर, 17 सेक्शन पेट्रोल पंप येथील अनधिकृत बांधकामांवर जेसीबी फिरवली.

निवडणुकीच्या काळात बांधकामे उभारली जातील, त्यांच्यावर आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार तात्काळ जेसीबी फिरवण्यात येणार आहे, अशी माहिती गणेश शिंपी यांनी दिली.

Web Title: JCB on unauthorized constructions in Ulhasnagar Action by Ulhasnagar Corporation