आता गुजरातीमधूनही  ‘जेईई’ची मुख्य परीक्षा

आता गुजरातीमधूनही  ‘जेईई’ची मुख्य परीक्षा
आता गुजरातीमधूनही ‘जेईई’ची मुख्य परीक्षा

मुंबई : जेईई मुख्य परीक्षेच्या भाषिक पर्यायांमध्ये हिंदी, इंग्रजीसोबत गुजराती भाषेचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकरच्या या निर्णयाला आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने विरोध दर्शविला असून  इंग्रजी आणि हिंदीसोबत केवळ गुजराती या एकाच प्रादेशिक भाषेला दिलेली अनुमती हा निर्णय भाषिक असंतोष वाढवणारा असल्याचे म्हटले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सचिन मानवडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

‘जेईई’ची मुख्य परीक्षा ६ ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. पूर्वी केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई बोर्ड) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी व हिंदी या दोन भाषांचाच पर्याय होता; मात्र यंदा परीक्षा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारा (एनटीए) परीक्षा घेतली जाणार आहे. संस्थेने जेईई परीक्षेबाबत नुकतीच माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली असून त्यात परीक्षेसाठी इंग्रजी, हिंदीसोबत गुजराती या एकमेव प्रादेशिक भाषेचा समावेश करण्यात आला आहे. 

हा निर्णय संविधानाच्या समानतेच्या अधिकाराची अवहेलना करणारा आहे. त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी आणि सुधारित निर्णय जाहीर करावा, तसेच भाषिक वाद टाळण्यासाठी भाषेविषयी निश्‍चित धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने केली आहे. अन्यथा याविरोधात संघटनेतर्फे विविध मार्गांनी  निषेध कार्यक्रम आयोजित केले जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद रणदिवे, प्रवक्ते बुद्धभूषण आणि सचिव शिवराज कांबळे व विनोद गोडबोले उपस्थित होते. सरकार जर प्रादेशिक भाषेच्या समावेशाचा आग्रह धरत असेल तर इतर १७ प्रादेशिक भाषांचा विचार का केला गेला नाही? असा सवाल संघटनेने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com