कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा?

कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा?

मुंबई -  अमित केळकर, वय ४४ वर्षे. आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार. वर्षभरापूर्वी चांगले कमावते असलेले कुटुंब. पण आता कंपनी बंद पडल्याने कुटुंबाचा खर्च, मुलींच्या शाळांची फी, आई-वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा, ही चिंता या कुटुंबाला भेडसावत आहे. 

‘जेट एअरवेज’ बंद झाल्यानंतर या कंपनीत काम करणाऱ्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांच्या घरातील हे प्रातिनिधिक उदाहरण. विलेपार्लेत राहणारे केळकर २२ वर्षे ‘जेट’च्या प्रशासकीय विभागात काम करीत. सध्या त्यांच्या पत्नीच्या पगारावरच सर्व कुटुंब अवलंबून आहे; पण हे कितपत टिकेल असा प्रश्‍न त्यांनाही पडला आहे. चांगल्या पगाराची नोकरी असल्याने घर, गाडी घेतली. आतापर्यंत त्याचे हप्ते नियमित भरत आहोत; पण पुढे काय होईल, हे माहीत नाही. जूनमध्ये दोन्ही मुलींच्या शाळेची फी कशी भरावी हा प्रश्‍नच आहे. आई-वडील दोघेही वृद्ध आहेत. त्यांच्या औषध-पाण्याच्या खर्चाचे काय होणार, ही चिंता सतावत असल्याचे केळकर म्हणाले.

केळकर ‘जेट’च्या एअरक्राफ्ट मेंटेनन्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. कामगारांच्या भवितव्याच्या मुद्द्यावर त्यांनी दिल्लीत नागरी हवाई उड्डाण मंत्रालयासह अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला; पण यश आले नाही. स्वत:च्या घराची जबाबदारी आहेच; पण युनियनचा उपाध्यक्ष असल्याने सहकाऱ्यांचीही समजूत काढावी लागते. त्यांना तरी काय सांगणार? आमचे रोजचे जगणे मुश्‍कील झाले आहे. एवढी वर्षे एकाच कंपनीत काम केल्यानंतर या पगाराची नवी नोकरी मिळेल का, असा प्रश्‍न ते स्वत:च विचारतात.

‘जेट’च्या अन्य कर्मचाऱ्यांची परिस्थिती याहून वेगळी नाही. या कंपनीत चार-पाच हजार जोडपी कामाला होती. दोघांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांच्या कुटुंबाची अवस्था वाईटच आहे. नूर अली लादानी व त्यांच्या पत्नी अंजूम त्यापैकीच एक. लादानी १४ वर्षे कंपनीत वरिष्ठ केबिन क्रू म्हणून काम करत होते. वेतनावर कर्ज काढून घर घेतले. मात्र, आता वेतन बंद झाल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे.

कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा?
मूळची पुण्याची असलेल्या अश्‍विनी काकडे आणि त्यांचे पती प्रफुल्ल हे दोघेही ‘जेट’मध्येच कामाला आहेत. प्रफुल्ल यांचा पगार तीन महिन्यांपूर्वीच; तर अश्‍विनी यांचा गेल्या महिन्यात थांबला. कंपनी पुन्हा उभारी घेईल, या आशेवर या दोघांनी घराचे हप्ते भरले नाहीत. एकाच्या पगारात गरजेचा खर्च करत होतो. पण आता दोघांचेही पगार बंद झाल्याने हप्ते भरणे शक्‍यच नाही. बॅंक तरी किती दिवसांची मुदत देणार. पुढील काही महिन्यात हप्ते न भरल्यास काय करायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. जून महिन्यात मुलीच्या शाळेची ६० हजार रुपये फी भरायची आहे. ती कोण देणार, ही चिंताही त्यांना सतावत आहे.

किती आत्महत्या हव्यात?
न्यायासाठी ‘जेट’च्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली होती. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर बोलू, असे उत्तर मिळाले. एकेक दिवस घालवणे आमच्यासाठी अवघड झाले आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आमच्या एका सहकाऱ्याने आत्महत्या केली. अजून किती आत्महत्या हव्यात आहेत? २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत थांबणे गरजेचे आहे का? २२ हजार कर्मचाऱ्यांपेक्षा निवडणुकीची आचारसंहिता महत्त्वाची असू शकते का, असे अनेक प्रश्‍न ‘जेट एअरवेज’चे सीनियर कस्टमर सर्व्हिस असिस्टंट प्रथमेश बेल्हेकर यांनी केले. 

उपचाराअभावी सहकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू
एका सहकाऱ्याच्या मुलाला कर्करोग झाला होता. मुलावर उपचार करण्यासाठी सहकाऱ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. संघटनेने त्यांना काही मदत केली; पण अशा परिस्थितीत आणखी जुळवाजुळव करणेही अवघड होते. पैसे जमवेपर्यंत त्या मुलाचा मृत्यू झाला, असे अमित केळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com