जवाहिऱ्याच्या दुकानावर नोकरांकडूनच दरोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

कोपरखैरणे  - जवाहिऱ्याच्या दुकानातील कामगारांच्या मदतीने दुकान लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 15 लाख 75 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

कोपरखैरणे  - जवाहिऱ्याच्या दुकानातील कामगारांच्या मदतीने दुकान लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 15 लाख 75 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ललित रिकबचंद सुतार (वय 36), नंदन सुनील दुबे (वय 23) आणि किसन गुर्जर (वय 18) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ऐरोली येथे गोदाराम गुर्जर यांचे कृष्णा ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात 17 मे रोजी दुपारी चार वाजता आलेल्या काही जणांनी गहाण दागिने सोडवण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील नोकर किसन गुर्जर व नंदन यांना मारहाण करीत दुकानातील सर्व दागिने घेऊन पोबारा केला. त्यांनी पळून जाताना सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून नेल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. या प्रकरणी नोकर किसन याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.

दुकानमालक गोदाराम व फिर्यादी किसन हे मेव्हणे असून, किसन हा त्यांच्या दुकानात काम करतो. गोदाराम यांचे गावी घर बांधण्याचे काम सुरू असल्याने ते सातत्याने गावी जात होते. त्यांच्या गावी ये-जा करण्याबाबत किसन याला माहिती होती. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला असता, दरोड्याचा बनाव उघड झाला. किसन व त्याचा मित्र ललित सुतार यांनी बनाव केला. त्यात दुकानातील आणखी एक नोकर नंदन दुबे यालाही सामील करून घेतले होते.

दुकानाचे मालक गोदाराम हे गावी गेल्यानंतर नोकरांकडून दुकानातील गहाण ठेवलेले सोने अन्यत्र गहाण ठेवून चैन केली जात होती; मात्र गोदाराम पुन्हा परतत असल्याचे समजताच, गहाण सोने पुन्हा सोडवून आणले जात होते. गोदाराम हे अचानक येत असल्याचे किसन याला कळले. त्यामुळे आता आपली चोरी उघड होण्याच्या भीतीने त्यांनी दुकान लुटण्याचा डाव आखला. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करून 585 ग्रॅमचे सुमारे 15 लाख 75 हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले, अशी माहिती उपायुक्त प्रशांत खैरे यांनी दिली.

Web Title: Jeweler's shop robbery

टॅग्स