नवी मुंबईतून निघणार "सोन्याचा धूर'! 

नवी मुंबईतून निघणार "सोन्याचा धूर'! 

मुंबई - ब्रिटिश राजवटीपासून सुरू असलेला मुंबईतील जगप्रसिद्ध झवेरी बाजार अडीच वर्षांत नवी मुंबईत स्थलांतरित होणार आहे. या बाजारात वर्षाला 65 ते 75 हजार कोटींची उलाढाल होते. हा सोन्याचा धूर नवी मुंबईतून निघणार असून, हा बाजारच देशातील सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दर ठरवणार आहे. 

काळबादेवी परिसरात 18 व्या शतकापासून सुरू असलेल्या या बाजारात देशातील 65 टक्के सोन्याचे व्यवहार होतात. हा बाजार नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 5) इंडियन ज्वेलरी पार्कचे भूमिपूजन झाले. सोने, चांदी, हिऱ्यांचे घाऊक व्यवसाय या बाजारात स्थलांतरित होणार आहेत. झवेरी बाजारात सोन्याचे दागिने घडवणारे 30 ते 40 हजार कारखाने आहेत. या कारखान्यांत तीन लाख कारागीर काम करतात. सोने, चांदी आणि हिऱ्यांची विक्री करणाऱ्या 100 हून अधिक पेढ्या आहेत. भविष्यात या बाजारातून फक्त किरकोळ व्यवहार होतील. झवेरी बाजारातून देशातील सोने, चांदी आणि हिऱ्यांचे भाव ठरवले जातात. हा बाजार नवी मुंबईत गेल्यावर तेथूनच हे भाव ठरवले जाण्याची शक्‍यता आहे. 

दागिने घडवण्याचे कारखाने, व्यापाऱ्यांची कार्यालये नवी मुंबईत जातील. सर्व प्रमुख व्यवहार जेम्स ऍण्ड ज्वेलरी एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सिल विकसित करत असलेल्या नवी मुंबईतील ज्वेलरी पार्कमधून होतील. 
- अशोक जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन 

स्थानिकांची घुसमट थांबणार 
झवेरी बाजारात मोठ्या प्रमाणात बेकायदा कारखाने सुरू झाले आहेत. सोने गाळण्यासाठी आणि दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेक रहिवाशांनी दक्षिण मुंबईतून अन्यत्र स्थलांतर केले. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापालिकेने अनेक बेकायदा कारखाने बंद केले. 

बॉम्बस्फोट व दुर्घटना 
झवेरी बाजारात दोन वेळा बॉम्बस्फोट झाले. जुन्या चाळीला 2015 मध्ये लागलेल्या आगीत तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी हुतात्मा झाले. या इमारतीमधील दागिने घडवण्याच्या कारखान्यांत असलेल्या रसायनांमुळे आग अधिक भडकली होती. राज्य सरकारने 2001 मध्ये नेमलेल्या समितीने दहशतवाद व अन्य संभाव्य आपत्ती ध्यानात घेऊन कारखाने मुंबईबाहेर हलवण्याची शिफारस केली होती. 

संघटनेच्या 65 हजार इमारती 
ज्वेलर्स असोसिएशनच्या तब्बल 64 इमारती आहेत. या इमारतींमध्ये दागिने घडवण्याचे काम होते. त्यापैकी अनेक इमारती धोकादायक झाल्या असून, टेकूवर उभ्या आहेत. 

झवेरी बाजाराची वैशिष्ट्ये 
- व्हिक्‍टोरियन गॉथिक शैलीतील इमारती 
- सोने, चांदी, हिऱ्यांची 100 पेक्षा जास्त दुकाने 
- दिवसाची उलाढाल 100 ते 150 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com