पूरग्रस्तांना "जेजे'चा मानसिक आधार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

डॉक्‍टरांसह सर्वसामान्यांसाठी खास माहिती पुस्तिका 

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे, हे अनेकांना कळत नाही. सांगली, कोल्हापुरात पुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले. या नागरिकांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी मुंबईतील जेजे रुग्णालय मानसिक आधार देत आहे. यासाठी खास माहिती पुस्तिका तयार करण्यात येत आहे. ही पुस्तिका डॉक्‍टरांसह सर्वसामान्यांनाही फायदेशीर ठरणार आहे. 

जेजे रुग्णालयातील विभाग प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यात पूरग्रस्त भागांतील आजार, तिथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा, डॉक्‍टरांची उपलब्धता आदींचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागांत दूषित पाण्यामुळे विविध आजार होण्याची भीती आहे. हा धोका लक्षात घेऊन रुग्णालयाकडून आवश्‍यक औषधे पाठवण्यात आली आहेत. पूरग्रस्तांना वैद्यकीय सेवा पुरवताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारच्या वतीने जेजे रुग्णालयामार्फत औषधांचा दोन ट्रक साठा कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

याशिवाय अशी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागातील प्रमुखांची मदत घेतली जात असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. पूरग्रस्त मानसिकदृष्ट्या खचले आहेत, त्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज भासल्यास मनोविकार तज्ज्ञही डॉक्‍टरांच्या पथकासोबत जातील, असेही डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JJ's mental support to flood victims!