न्यायाधीशांची पोस्ट लाईक करणे हे वकिलांचे गैरवर्तन - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुंबई - सोशल मीडियावर न्यायाधीशांनी केलेली पोस्ट वकिलांनी "लाईक' करणे म्हणजे व्यावसायिक गैरवर्तन ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. पुण्यातील एका न्यायाधीशांच्या पोस्टला लाईक केल्यामुळे संबंधित वकिलाच्या प्रकरणाची सुनावणी अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याचा निर्णयही उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

पुण्यातील एका जिल्हा न्यायाधीशांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यावर एका वकिलाने कमेंट करून पोस्ट लाईक केली होती.
संबंधित वकिलाचा एक व्यक्तिगत कौटुंबिक दावा या न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू आहे. न्यायाधीशांची पोस्ट आणि संबंधित प्रकरणाचा कोणताही संबंध नव्हता; मात्र वकिलाने ही पोस्ट लाईक केल्यावर न्यायाधीशांनी संपूर्ण प्रकरण मुख्य न्यायाधीशांसमोर मांडले. त्यानंतर मुख्य न्यायाधीशांनी संबंधित दाव्याची सुनावणी अन्य न्यायाधीशांकडे वर्ग केली. या निर्णयाला वकिलाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि नितीन सांब्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीशांनी दिलेला निर्णय योग्य आहे. अशाप्रकारे एखाद्या न्यायाधीशाने सोशल मीडियावर पोस्ट केली असेल आणि एखादा वकील किंवा पक्षकारांनी (ज्यांची प्रकरणे न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी आहेत) त्यावर प्रतिक्रिया दिली, तर ते व्यावसायिक गैरवर्तन ठरू शकते. अशा परिस्थितीत न्यायाधीशांनी संबंधित प्रकरणापासून दूर होण्याचा निर्णय योग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच जर असे घडले, तर त्या वेळी संबंधित न्यायाधीशांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने याबाबतचा निर्णय घ्यायला हवा, असेही खंडपीठाने अधोरेखित केले.

Web Title: Judge Post like lawyer Abuse high court