कलावंतीण दुर्ग मोहीम फत्ते

कर्जत : कलावंतीण गड सर केल्यानंतर आनंद व्यक्‍त करताना अपंग गिर्यारोहक जनार्धन पानमंद.
कर्जत : कलावंतीण गड सर केल्यानंतर आनंद व्यक्‍त करताना अपंग गिर्यारोहक जनार्धन पानमंद.

कर्जत : महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यातील किल्ल्यांची ओळख आजच्या पिढीला व्हावी, यासाठी खेड तालुका गिर्यारोहक ग्रुपने कलावंतीण दुर्ग आरोहण मोहीम आयोजित केली होती. यात कर्जत तालुक्‍यातील 52 वर्षीय अपंग गिर्यारोहक जनार्धन पानमंद यांनी सहभागी होऊन कलावंतीण गड यशस्वीपणे सर केला. पहाटे 4.11 मिनिटांनी बोचऱ्या थंडीत ठाकर वाडीवरून प्रबळ माचीकडे प्रस्थान केले. सुमारे एक तासाच्या परिश्रमानंतर सर्व सहकारी 3 किलोमीटर अंतर कापून माचीवर पोहोचले.

प्रबळ माची म्हणजे कलवंतीण दुर्गचा पायथा. साधारण 2 हजार 250 फूट उंच असणारा कलावंतीण दुर्ग म्हणजे एक सुळका. कातळात कोरलेल्या पायऱ्या हे त्याचे वैशिष्ट्य. खेड तालुका गिर्यारोहक ग्रुपचे प्रमुख किशोर राक्षे यांनी सर्व गिर्यारोहकांना सुरक्षेच्या सूचना देऊन सकाळी साडेसहा वाजता मुख्य चढाई सुरू झाली. नेहमीप्रमाणे अनुभवी गिर्यारोहक साथीदारांसह वेगात गड चढत होते. सुमारे एक ते दीड तासानंतर सर्व जण गडावर पोहोचले. 

गडावर आल्यावर छत्रपती "शिवाजी महाराज की जय' आणि "छत्रपती संभाजी महाराज की जय'च्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला. काही वेळ गडावर विश्रांती घेऊन गड उतरायला सुरुवात झाली. अत्यंत सावध व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व जण खाली उतरले, परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. अशा तऱ्हेने कलावंतीण दुर्ग आरोहण मोहीम फत्ते झाली. या मोहिमेत कर्जतचे गिर्यारोहक पानमंद यांच्यासह खेड तालुका गिर्यारोहक ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते.

कलावंतीण दुर्ग 
मुंबई-पुणे मार्गावर पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत दुर्ग कलावंतीण हा डोंगरवजा किल्ला आहे. हा दुर्ग प्रबल गडालगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, कर्नाळा किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. 

अपंग गिर्यारोहकाची उत्तुंग भरारी 
कर्जत तालुक्‍यांतील पोखरकर वाडीतील छोट्याशा गावात जनार्दन पानमंद राहतात. पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ते लिपिक पदावर कार्यरत आहेत. मात्र जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडसाच्या बळावर त्यांनी अपंगत्वावर मात देत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक गड, किल्ले सर केले आहेत. दृढ निश्‍चयाने त्यांनी आजपर्यंत कळसूबाई पाच वेळा सर केले. तसेच शिवनेरी, रायगड किल्ला, तोरणा, सिंहगड, कुलाबा, कोथळीगड, लिंगाणा, राजगड, चंदेरी , रतनगड, हरिचंद्रगड, वसईगड, कळसूबाई शिखर, लिंगाणा, तुंगागड, ढाक बहिरी अशा अनेक गडकिल्ले, शिखरांवर त्यांनी यशस्वी गिर्यारोहण केले आहे. जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेट सर करण्याची जिद्द त्यांनी मनाशी बाळगून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com