सात वेळा काँग्रेसकडून आमदार राहिलेले घेणार 'हाता'त कमळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पक्षप्रवेश न करता भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि सात वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर येत्या मंगळवारी (ता. ३०) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना पक्षप्रवेशासाठी सुरू असलेल्या भरतीला अमावास्येनंतर खीळ बसण्याची शक्‍यता असल्याने पुढील चार दिवसांत या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पक्षप्रवेश न करता भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेले कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आणि सात वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर येत्या मंगळवारी (ता. 30) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरू होणार आहे. तसेच बुधवारपासून अमावास्या सुरू होत असल्याने पक्षप्रवेशासाठी कोळंबकर यांनी मंगळवारचा मुहूर्त काढला आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे शिलेदार असलेले कोळंबकर हे राणे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरही आमदारकीसाठी कॉंग्रेसमध्येच राहिले होते. मात्र, राणे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कोळंबकर मनाने कॉंग्रेसपासून दुरावले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात प्रचार करत शिवसेना-भाजपला साथ दिली होती.

कोळंबकर यांनीही कॉंग्रेस सोडत असल्याचे मान्य केले. पोलिस आणि गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न जो पक्ष सोडवणार, त्याच पक्षाला पाठिंबा द्यायचा, हे कोळंबकर यांचे धोरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही प्रश्नांत लक्ष घातलेले असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत राहणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. 

वडाळा मतदारसंघावर वर्चस्व 
कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून ते सात वेळा निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदीलाट असतानाही कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. पाच वेळा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली तेव्हा कोळंबकर यांनीही राणेंसोबत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राणे यांनी 2017 मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र, कोळंबकर राणेंसोबत न जाता कॉंग्रेसमध्ये राहिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalidas kolambkar Entry in BJP Politics