कळवा, मुंब्रा, मालेगावातील वीजवितरण खासगी कंपन्यांकडे! 

Kalva Mumbra Malegaon electricity distribution to Private companies
Kalva Mumbra Malegaon electricity distribution to Private companies

ठाणे : कळवा-मुंब्रा शहर, तसेच नाशिक येथील मालेगावात होणाऱ्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील विजेचे वितरण खासगी कंपन्यांकडे दिले जाणार असल्याची माहिती शनिवारी महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. यासाठी महावितरणने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांत हे खासगीकरण होणार आहे. त्यामुळे कळवा-मुंब्रा शहरातील नागरिकांना वीज समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे. 

कळवा-मुंब्रा भागात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो; मात्र या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात वीजचोरी झाली आहे. कळवा-मुंब्रा शहरात 296 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मालेगावातही हीच परिस्थिती आहे. या भागात गेल्या काही महिन्यांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे थकबाकी आणि वीजचोरी करणाऱ्यांचा भुर्दंड प्रत्येक महिन्याला वेळेवर वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. कळवा, मुंब्य्रात दिवसा-रात्री वारंवार वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. या शहरांमध्ये विजेची मागणी जास्त आहे; मात्र वसुलीचे प्रमाण फार कमी आहे. वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले होते. याला आळा घालण्यासाठी महावितरण कळवा, मुंब्रा शहरातील; तसेच मालेगावातील वीजपुरवठा खासगी कंपनीकडे सोपवणार आहे. त्यानंतर शहरात वीजपुरवठा करण्याबरोबरच संबंधित खासगी कंपनी थकबाकीदारांकडून वसुलीही करणार असल्याची माहिती पाठक यांनी दिली.

यासंबंधी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. त्यासाठी पाच ते सहा कंपन्यांनी पसंती दर्शविल्याची माहितीही त्यांनी दिली. यापूर्वी भिवंडी शहरातही खासगी वीजपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. पाठक यांनी राज्यात 4 वर्षांत महावितरणने केलेल्या कामाची माहिती दिली. रहिवासी भागात 24 तास वीजपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 

"समृद्धी'लगतच्या गावांना जमिनीतून वीजवाहिनी 
शहापूर येथे समृद्धी महामार्ग होत आहे. या महामार्गालगत नव्याने वसणाऱ्या गावांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने जमिनीतून वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट तसेच वीजचोरीचे प्रमाण कमी होईल, असे पाठक यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com