कल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा: सचिन पोटे

रविंद्र खरात
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

राज्याचे  विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांना एका पत्राद्वारे काँग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी लक्ष्य वेधले आहे .कल्याण डोंबिवली महापालिका आर्थिक संकटात  सापडली आहे. आजमितीस या महापालिकेची वित्तीय तूट ही 1 हजार कोटींच्या पार पोहचली आहे.

कल्याण : केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना विकास काम होत नाही म्हणून आयुक्त कार्यालयमध्ये जावून शिवेसना नगरसेवकाना आंदोलन करावे लागते ही दुर्देवी बाब असल्याची खिल्ली उडवित, आर्थिक डोलारा कोसळलेली कल्याण-डोंबिवली महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे.

राज्याचे  विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांना एका पत्राद्वारे काँग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी लक्ष्य वेधले आहे .कल्याण डोंबिवली महापालिका आर्थिक संकटात  सापडली आहे. आजमितीस या महापालिकेची वित्तीय तूट ही 1 हजार कोटींच्या पार पोहचली आहे. पालिकेत शिवसेना-भाजप सत्तेमध्ये वाटेकरी असले तरी विकासकामे आणि इतर नागरी प्रश्नांवर शिवसेनेलाच सतत आंदोलनं करावी लागत आहेत अशी खिल्ली काँग्रेस कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी उडवली आहे.

सत्ताधारी पक्षालाच वारंवार झगडावे लागत आहे यापेक्षा दुर्दैव ते आणखी काय म्हणावे? असा सवाल पोटे यांनी केला आहे. काही महिन्यांत नागरी प्रश्नांवरून सेनेला अनेकवेळा आंदोलन करावे लागत आहे, हे एकप्रकारे सत्ताधारी म्हणून यांचे अपयशच आहे. केंद्र , राज्य आणि पालिकेत ही भाजपा सोबत शिवसेना सत्तेत असताना सतत आंदोलन करावे लागत आहे. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या सेना भाजपमध्येदेखील बऱ्याच वेळा वाद होत असून त्यांचे एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू असतात.या सर्व घटनांचा परिणाम कल्याण डोंबिवलीच्या विकासावर आणि नागरी कामांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये झालेला समावेश वगळता ही  महापालिका म्हणजे 'अंधेर नगरी आणि चौपट राजा' अशी झाली आहे. या महापालिकेत कोणाचाच पायपुस कोणाच्या पायात नसल्याचेच गेल्या 2 वर्षांच्या कारभारावरून दिसून येत आहे. नागरिकांना स्मार्टसिटीच्या गोंडस नावाखाली विकासाची भलीमोठी स्वप्नं दाखवायची आणि प्रत्यक्षात मात्र दात कोरून पोट भरायचे. त्यामूळे कल्याण डोंबिवलीचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत झालेला खडखडाट आणि दुसरीकडे विकासकामांच्या नावाने सत्ताधाऱ्यांचीच सुरू असणारी बोंबाबोंब यावरूनच सर्व चित्र स्पष्ट होत आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरु असून त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेचा कोसळलेला आर्थिक डोलारा आणि माजलेली बजबजपुरी पाहता ही महापालिका राज्य शासनाने तातडीने बरखास्त करावी , आणि राज्य शासनाने ती आपल्या ताब्यात घेऊन तिचा कारभार हाकावा अशी मागणी सचिन पोटे यांनी राज्याचे  विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेे केली आहे.

Web Title: Kalyan Dombivali municipal corporation congress sachin Pote