कल्याण - औद्योगिक प्रदूषण, अपुऱ्य़ा सोयी सुविधांमुळे नागरिक त्रस्त

सुचिता करमरकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कल्याण : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण समस्येबरोबरच सार्वजनिक सोयी सुविधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदारी घेत नाही अशा कात्रीत येथील रहिवासी अडकले आहेत. 

कल्याण : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण समस्येबरोबरच सार्वजनिक सोयी सुविधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदारी घेत नाही अशा कात्रीत येथील रहिवासी अडकले आहेत. 

दिड लाखांची नागरी वस्ती असलेल्या या परिसरात रस्ते, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य अशा प्रार्थमिक समस्या भेडसावत आहेत. 2015 ला कडोमपात समाविष्ट झाल्यानंतरही येथील परिस्थिती कायम राहिली. सत्ताधारी स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींकडे महापौरांनी तसेच पालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे आता चक्क खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवत या परिसरातील समस्यांकडे लक्ष द्या असे सांगावे लागले.

कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसतानाही करांची अवाजवी बिले पाठवल्याने रहिवासी नाराज आहेत. या निवासी विभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्याचे वारंवार सांगूनही त्यांची दुरुस्ती होत नाही. मागील अनेक वर्ष हे रस्ते दुरुस्त झालेच नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा भाग पालिकेत समाविष्ट करण्यात आल्याने रस्ते दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगत मंडळाने हात झटकले आहेत. मात्र या भागात महानगर गॅस तसेच रिलायन्स जिओच्या कामासाठी रस्ते खोदण्याची परवानगी मंडळाने कशी दिली असा सवाल केला जात आहे. ही परवानगी देताना आकारण्यात येत असलेली खड्डे फी मात्र मंडळ संबंधित यंत्रणांकडून वसूल करत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. महानगर गॅसकडून मंडळाने खड्डे फी म्हणून दोन कोटी रुपये घेतले आहेत. जर मंडळ ही फी वसूल करत असेल तर खड्डे दुरुस्ती का होत नाही? असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

रात्रीच्या वेळी येथील पथदिवे बंद असल्याने महिला, विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची समस्याही निर्माण झाली आहे. नोकरदारांचे शहर असल्याने रात्री उशीरापर्यंत या परिसरात वर्दळ असते. मात्र अंधारामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या समस्येकडे ही पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. हा भाग पालिकेत समाविष्ट केल्यापासून येथील कचरा समस्येकडेही लक्ष दिले जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

मिलाप नगर तलावात मुर्ती विसर्जन बंद करत पालिकेने एका चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या तलावाच्या स्वच्छतेसाठी पावले उचलली गेली नाहीत. या वर्षीच्या अंदाज पत्रकात या कामासाठी पंचवीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे प्राधान्याने हाती घेण्यात येणाऱ्या कामांमधे यांचा समावेश होणार का?  हा प्रश्न आहे. 

- राजू नलावडे, डोंबिवली वेलफेअर असोसिएशन

औद्योगिक मंडळ आणि पालिका या दोन यंत्रणांकडून आमच्यावर अन्याय होत आहे. पालिकेत असल्याने कर भरायचा पण सुविधा मात्र कोणत्याही नाहीत ही वस्तूस्थिती आहे. 

- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, कडोमपा

या परिसरातील रस्त्यांची कामे करायचा प्रस्ताव आहे. मात्र त्यापूर्वी रस्ते रुंदीकरण होण्याची आवश्यकता आहे. रस्ते रुंदीकरण करण्याची जबाबदारी औद्योगिक मंडळाची आहे. साधारण एक वर्षापूर्वी त्यांना त्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

Web Title: kalyan dombivali municipal corporation various problems to citizens