संमेलनात 27 गावांच्या ठरावामुळे कलगी तुरा ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी - शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यातील कलगी तुरा नव्वदाव्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगला. संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात सत्तावीस गावांची महानगरपालिका किंवा नगर परिषद करावी हा ठराव मांडण्यात आला. त्या वेळी कल्याण-डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या ठरावाला कडक शब्दांत विरोध केला. 

पु. भा. भावे साहित्यनगरी - शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यातील कलगी तुरा नव्वदाव्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगला. संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात सत्तावीस गावांची महानगरपालिका किंवा नगर परिषद करावी हा ठराव मांडण्यात आला. त्या वेळी कल्याण-डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या ठरावाला कडक शब्दांत विरोध केला. 

राज्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप यांच्यात राजकीय रंगत असतानाच संमेलनाच्या व्यासपीठावरही त्याचे रंग गडद झाले. खुल्या अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे सत्तावीस गावांचा ठराव मांडला गेला. पालिकेचे महापौर म्हणून या ठरावाला महापौर देवळेकर यांनी त्याला विरोध केला. आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी हस्तक्षेप करत अपवाद म्हणून महापौरांना या विषयातील त्यांचा काही ठराव असल्यास ते मांडण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मात्र सत्तावीस गावांच्या बाजूने भूमिका मांडत स्वतंत्र नगर परिषदेला पाठिंबा दिला. 

ठराव वाचन पूर्ण झाल्यावर महापौर देवळेकर यांनी तीन ठराव मांडले. या परिसरातील भाल, भोपर येथील 90 एकर जागेवर डंपिंग ग्राउंडचे आरक्षण आहे, हे आरक्षण रद्द केले जावे, असा ठराव महापौरांनी मांडला. सरकारने या गावातील 1089 एकर इतकी जमीन ग्रोथ सेंटरसाठी आरक्षित केली आहे, ही भूमिका बिल्डर धार्जिणी असल्याचे सांगत त्यालाही विरोध करणारा ठराव त्यांनी मांडला. संमेलनाच्या उद्‌घाटनात बेळगाव-कारवारसाठी घोषणा दिल्या गेल्या होत्या. बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा तिसरा ठराव देवळेकरांनी मांडला. देवळेकरांनी मांडलेल्या ठरावानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रोथ सेंटरबाबतची सरकारची भूमिका मांडली. सरकार या ग्रोथ सेंटरसाठी कोट्यवधी रुपये देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या सेंटरच्या माध्यमातून पन्नास हजार जणांना रोजगार मिळू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनीही "ग्रोथ सेंटर'मध्ये प्रस्थापित होणाऱ्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली. 

संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी हा विषय मांडला होता त्याला अनुकूल भूमिका माडत मुख्यमंत्र्यांनी या विषयाला पूर्ण विराम दिला होता. आज पुन्हा व्यासपीठावर राजकारण रंगलेले पहायला मिळाले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मात्र त्यात हस्तक्षेप टाळला. 

Web Title: Kalyan-Dombivli Municipal Mayor Rajendra devalekar