
Kalyan Crime : दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, भर चौकातच एकमेकींना मारहाण
कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाशेजारी दोन दुचाकी वाहनांची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही वाहनचालकामध्ये तुफान राडा झाला आहे. यावेळी दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी करत भर चौकातच एकमेकींना मारहाण सुरू केली. तब्बल वीस मिनिटं ही हाणामारी सुरू असून वाहतूक पोलीस व पोलिसांच्या मदतीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा श्री. तिसाई माता पूल (पत्रिपुल) ते दुर्गाडी किल्ल्याला जोडणारा गोविंद बायपास रोडवर आज सायंकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान दोन दुचाकी वाहनाची धडक झाली. या धडकेनंतर चुकी कोणाची हे न पाहता दोन्ही वाहन चालकांमध्ये भर रस्त्यातच तुडुंब हाणामारी सुरू झाली. विशेष म्हणजे हे ट्रॅफिक पोलिसांसमोर झाले.
वाहन चालकाची हाणामारी होत असताना त्यांच्या पाठी बसलेल्या दोन्ही महिलाही आपसामध्ये एकमेकींना भिडल्या. मग काय वाहन चालक या महिलांची भांडण सोडवण्यासाठी इतर प्रवासी प्रयत्न करू लागले. ही फ्री स्टाईलमध्ये सुरू असलेली हाणामारी तब्बल वीस मिनिटं सुरू होती. महिलाची हाणामारी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती.
घडलेला प्रकाराची माहिती एका वाहतूक पोलिसाने ही बाब महिला अंमलदारांना कळवले. माहिती मिळतात महिला अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणत वाहतूक कोंडी सुरळीत केली. ही फ्री स्टाईलची हाणामारी प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून, सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.