कल्याण-नगर एसटी बससेवा पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

राज्य परिवहन मंडळाने माळशेज घाटमार्गे बससेवा बंद केली होती

ठाणे : कल्याण-माळशेज घाट- नगर मार्गावर अखेर पुन्हा एसटी बस फेऱ्या चालू करण्यात आल्या आहेत. महसूल विभाग अथवा आपत्कालीन प्रशासन विभाग यांनी कल्याण- माळशेज घाट - नगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याचे जाहीर केलेले नसतानाही राज्य परिवहन मंडळाने माळशेज घाटमार्गे बससेवा बंद केली होती; मात्र इतर वाहनांची वाहतूक सुरू होती.

एसटी अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन कल्याण - माळशेज घाट - नगर रस्त्यावरील एसटी वाहतूक बंद केली होती. त्यामुळे या मार्गावरील एसटीच्या 150 फेऱ्या रद्द झाल्याने लोकांचे हाल होत होते.

माळशेज घाटापुढे करंजाळे गावाजवळ 100 मीटर रस्ता खचल्याने तो वाहतुकीस धोकादायक बनला असल्याने या मार्गावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची शिफारस राष्ट्रीय महामार्ग विभागाने महसूल प्रशासनाला केली होती; मात्र अजूनही महसूल प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचे जाहीर केलेले नाही.

त्यामुळे इतर वाहनांची वाहतूक चालू असताना एसटी अधिकाऱ्यांनी मात्र माळशेज घाट मार्गे एसटीची बससेवा बंद करण्याचा निर्णय कोणाच्या आदेशाने घेतला, याबाबत प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan-Nagar ST bus service resumes