कल्याणमधील रिक्षाचालकांच्या चारित्र्याची कसून तपासणी कारण्याची मागणी

रविंद्र खरात
शनिवार, 8 जुलै 2017

बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई सुरू असून 10 जुलैपासून जे रिक्षाचालक रिक्षामध्ये रिक्षाबाबत सविस्तर माहिती लावणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली.

कल्याण - मागील काही महिन्यात रिक्षाचालकांकडून महिलांच्या विनयभंगाच्या पार्श्‍वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षाचालकांना परवाना देताना त्यांच्या चारित्र्याची कसून तपासणी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह प्रवासी संघटनांनी पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे केली आहे.

रिक्षाचालकांना परवाना वितरित करण्याचे काम सध्या सुरू आहे. परवाना मिळविताना चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे लागते. कल्याण डोंबिवली शहरात साठ टक्‍क्‍याहून अधिक महिला नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात. त्यापैकी बहुतेक महिला रिक्षाने प्रवास करतात. मात्र मागील काही महिन्यात कल्याण पूर्व आणि पश्‍चिम भागात रिक्षा चालकांनी महिला आणि विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय कल्याण पश्‍चिम रेल्वेस्थानकासमोर सायंकाळी बसस्थानक आणि रिक्षा स्थानकासमोर देहविक्रय करणाऱ्या महिलांचा वावर असल्याने सर्वसामान्य महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावनाही निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर रिक्षाचालकांना परवाना देताना त्यांच्या चारित्र्याची कसून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा कल्याण शहर महिला अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी, सोनाली भगत, भावना मनराजा, उषा दिसले, वंदना कबाडे, ज्योती शर्मा, रेखा सूर्यवंशी, प्रमिला कदम, वैशाली ठोसर, समृद्धी देशपांडे, वासंती कुलकर्णी, वीणा लीलावत आणि प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके आदींनी केली आहे.

भाजपा पदाधिकाऱ्यांसह, प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे आणि वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबजी आव्हाड यांची भेट घेवून समस्या मांडत निवेदन दिले. बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई सुरू असून 10 जुलैपासून जे रिक्षाचालक रिक्षामध्ये रिक्षाबाबत सविस्तर माहिती लावणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मागण्या

  • रिक्षाचालकांची मागील एका वर्षापेक्षा अधिक काळाची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासावी.
  • कल्याण रेल्वे स्थानकसमोर आणि रिक्षा स्थानक परिसरामध्ये उभ्या असलेल्या वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करावी.
  • रिक्षात रिक्षाचालकाने आपली माहिती न लावल्यास कठोर कारवाई करावी
  • शहरात जागो जागी महिलांच्या मदतीसाठी हेल्प लाइन नंबर पोस्टरच्या माध्यमातून ठळकपणे प्रदर्शित करावेत.
  • सायंकाळी पोलिसांनी स्टेशन परिसरामध्ये गस्त घालावी.
Web Title: kalyan news autorikshaw marathi news sakal news