स्वाइन फ्लू रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेची तयारी

सुचिता करमरकर
गुरुवार, 6 जुलै 2017

कल्याण: मागील काही दिवसांपासून वेगाने पसरत असलेल्या एच1 एन1 म्हणजेच स्वाइन फ्लू रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण: मागील काही दिवसांपासून वेगाने पसरत असलेल्या एच1 एन1 म्हणजेच स्वाइन फ्लू रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या संपुर्ण राज्यात स्‍वाईन फ्लूचे रुग्‍ण आढळून येत आहेत. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही या आजाराचे रुग्‍ण आढळले आहेत. जानेवारी 2017 पासुन पाच जुलै पर्यंत पालिका क्षेत्रात 44 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 6 रुग्‍ण कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका परिसराबाहेरुन आले असून त्‍यापैकी दोन रुग्णांचा मृत्‍यू झाला आहे. 42 रुग्‍णांपैकी 36 रुग्‍ण योग्‍य त्‍या औषधोपचाराने बरे झाले आहेत, उर्वरित 6 रूग्‍णांवर विविध रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात या आजाराचा प्रार्दुभाव रोखण्‍याकरिता आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्‍यात येत आहेत. महापालिकेच्या दोन्‍ही रुग्‍णालयात तसेच कल्‍याण पूर्वेतील गीता हरकिसनदास दवाखाना, नेतीवली दवाखाना तसेच सालेह मोहम्‍मद दवाखाना,कल्‍याण पश्चिम येथे स्क्रिनींग सेंटर सुरु करण्‍यात आलेले आहे. जानेवारीपासून येथे 770 रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आलेली आहे. पालिकेच्या दोनही रुग्णालयात तसेच  एम्‍स हॉस्‍पीटल, डोंबिवली पुर्व येथे रूग्‍णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

पालिकेचा आरोग्य विभाग या उपाय योजना करत असल्याचे सांगत असला तरीही सभागृह नेते राजेश मोरे यांनी आज (गुरुवार) डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात केलेल्या पाहणीदरम्यान औषधांच्या पुरवठ्याबाबत असमाधानकारक परिस्थिती पुढे आली. लहान मुलांसाठी आवश्यक असलेले सिरप याठिकाणी उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो वेगाने पसरण्याची भीती आहे. सर्दी खोसला, घसा खवखवणे असा त्रास होत असलेल्यांनी त्वरित डॉकंटरांकडे तपासणी करावी असे आवाहन पालिकेने केले आहे. या रुग्णाला इतरांपासून दूर ठेवण्याची गरज असल्याने खाजगी रुग्णालयांना तसेच डॉक्टरांच्या संघटनांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: kalyan news kalyan dombivli municipal corporation and swine flue