कल्याण: नेवाळीकरांचा श्रावणातील सणांवर बहिष्कार

मयुरी चव्हाण काकडे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आंदोलनकर्त्या शेतक-यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. येथील शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबत सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून यासंदर्भात आपण लक्षवेधी देखील मांडली आहे.
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व 

कल्याण : नेवाळी येथे जून महिन्यात जमीन संपादनावरून झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता नेवाळी परिसर पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. श्रावण महिन्यातील रक्षाबंधन, गणेशोत्सव तसेच गोकुळाष्टमी हे सण साजरे न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून नेवाळी नाका परिसरात यासंर्दभात फलक देखील लावण्यात आला आहे.

रविवारी (ता. 6) नेवाळी येथे ग्रामस्थांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत आंदोलनकर्त्या शेतक-यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी तसेच अटक झालेल्या आंदोलकर्त्यांच्या  सुटकेसाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तसेच आंदोलनानंतर संरक्षण मंत्रालयाच्या नौसेनेने जारी केलेल्या नियतकालिकेतील जाहीर नोटिशीचा निषेध नोंदविण्यासाठी नेवाळी नाका परिसरात यासंदर्भात फलक लावण्यात आला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे श्रावण महिन्यात नेवाळी परिसरात सण साजरे होणार की नाही? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

आंदोलनकर्त्या शेतक-यांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून अनेकांना अटकही झाली आहे. पोलिस अजूनही या घटनेचा तपास करत असल्यामुळे गावक-यांशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर उघडपणे बोलण्यास नकार दिला.

*नेवाळी विमानतळाची सुमारे 1600 एकर जागा संरक्षण खात्याची नसून आमचीच आहे असा शेतक-यांचा दावा आहे. अनेक वर्षांपासून खदखदत असलेला शेतक-यांचा असंतोष 22 जून रोजी उफाळून आला आणि नेवाळी परिसरात हिंसक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनात 12 पोलिस आणि 12 शेतकरी जखमी झाले होते. 

आंदोलनकर्त्या शेतक-यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. येथील शेतक-यांवर होणा-या अन्यायाबाबत सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून यासंदर्भात आपण लक्षवेधी देखील मांडली आहे.
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Kalyan news Newali farmer agitation against police