कल्याण: पालिकेच्या प्लॅस्टिक बंदीला 'सकाळ'च्या चळवळीने मिळेल बळ

सुचिता करमरकर
सोमवार, 24 जुलै 2017

पंधरा जुलैपासून कडोमपा क्षेत्रात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. शहराची मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात प्रभाग पातळीवर समिती तयार करण्यात येणार आहे. ही बंदी लागू झाल्यावर पालिकेने प्रभाग स्तरावर कारवाई सुरु केली असून आत्तापर्यंत एकुण सातशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेने प्लॅस्टिक बंदी करत त्यानुसार कारवाई सुरु केली आहे. सकाळच्या गणेशोत्सवातील प्लॅस्टिक विरोधी चळवळीने पालिकेच्या बंदीच्या मोहिमेला अधिक बळ मिळेल अशी आशा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे तसेच पालिका आयुक्त पी. वेलारसू यांनीही सकाळच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

पंधरा जुलैपासून कडोमपा क्षेत्रात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. शहराची मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात प्रभाग पातळीवर समिती तयार करण्यात येणार आहे. ही बंदी लागू झाल्यावर पालिकेने प्रभाग स्तरावर कारवाई सुरु केली असून आत्तापर्यंत एकुण सातशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. शहरातील व्यापारी, फेरीवाले तसेच भाजीविक्रेत्यांचा या मोहिमेला पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धड़क कारवाई करत दंडाची वसुली करणे त्याचबरोबर गुलाब पुष्प देत या सर्वांचा सहभाग वाढवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत आहे.

गणेशोत्सव काळात सकाळ वृत्तपत्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी समाधान व्यक्त केले. वृत्तपत्ते लोकशाहीतील चौथा स्तंभ आहेत. काळानुसार त्यांची जबाबदारी बदली आहे हे ओळखून सकाळने उचलेले हे पाऊल गरजेचे आहे. वृत्तपत्रातून प्लॅस्टिक वापर टाळण्याची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचेल ज्यामुळे पालिकेच्या बंदीच्या निर्णयाला अधिक पाठींबा मिळेल असेही महापौर म्हणाले. स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनीही या मोहिमेचे कोतुक केले. प्लॅस्टिकच्या वापराने होणारे दुष्परिणाम सर्वांना माहिती आहेत मात्र त्यावर काय उपाय असेल हे सकाळच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक निवडणूकीत राजकारणी मत मागायला जनतेपर्यंत जातो, मात्र प्लॅस्टिक विरोधी दिंडी काढून आपण नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याची विनंती केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. गणेशोत्सव काळातील या मोहिमेला सक्रिय पाठींबा देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

प्लॅस्टिक बंदीवर प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त पी वेलारसू नजर ठेवून आहेत. पालिकेच्या या मोहिमेचा एक भाग म्हणून गणेशोत्सवात त्या अनुषंगाने एखादी स्पर्धा घेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. समाजात जागरुकता निर्माण करण्याची जबाबदारी वृत्तपत्रांची आहे, सकाळने आपली जबाबदारी ओळखून ही मोहिम हाती घेतल्याबद्दल वेलारसू यांनी कौतुक केले.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Kalyan news plastic ban with sakal