कल्याणमधील वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅन बंद

रविंद्र खरात
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

फेरीवाला विरोधात कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रस्त्यात खड्डे खराब यामुळे आम्ही त्रस्त असताना बेशिस्त वाहन चालकांनी रस्त्यात वाहन पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पालिकेने रस्ते दुरुस्ती करावी तर वाहतूक पोलिसांनी टोइंग व्हॅनचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कल्याण प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांनी केली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरातील बेशिस्त दुचाकी वाहन चालकांवर वचक बसावा म्हणून वाहतूक पोलिसांकडून टोइंग व्हॅन मार्फत कारवाई होत असे मात्र मागील एक ते दिड महिन्यापासून टोइंग व्हॅन बंद असल्याने शहरातील बेशिस्त वाहन चालकांची दादागिरी वाढली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक सहित नागरीक त्रस्त झाले आहेत. 

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यात, नो पार्कींग क्षेत्रात दुचाकी वाहन पार्क केल्यावर वाहतूक पोलिस टोइंग व्हॅन मार्फत ते वाहन वाहतूक पोलिस ठाण्यात नेऊन त्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत असे. त्यामुळे काहीसा वाहन चालकांवर वचक बसला होता. टोइंग व्हॅन ही खासगी ठेकेदार मार्फत चालवली जात असे त्यावर एक वाहतूक पोलीस नियंत्रणासाठी दिला जात होता. 

कल्याण पश्चिममधील शिवाजी चौक, स्टेशन, आग्रा रोड, डी मार्ट, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज रोड, महानगर पालिका मुख्यालय तसेच कल्याण पूर्व मध्ये मेट्रो मॉल, पूनालिंक रोड, गणपती चौक ते काटेमानवली नाका, तिसगाव नाका ते सिद्धार्थनगर, कल्याण शिळफाटा रोड, टाटा पावर, चक्कीनाका, हाजीमलंग रोड वर अस्ताव्यस्त दुचाकी पार्क केल्यावर वाहतूक पोलिस प्रति दिन टोइंग व्हॅन मार्फत कारवाई करत असे तर कार आणि अवजड वाहन पार्क केल्यास त्यांच्यावर जामर मार्फत कारवाई केली जात होती. 

मात्र टोइंग व्हॅनच्या संबधित ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने टोइंग व्हॅन एक ते दिड महिना वाहतूक पोलिस कार्यालयाजवळ धूळ खात पडल्याने बेशिस्त वाहन चालकांची दादागिरी वाढली आहे. खासगी ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने टोइंग व्हॅन उभी असली तरी बेशिस्त वाहन चालकाविरोधात काही ठिकाणी जामर तर काही ठिकाणी वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करतात मात्र ती तोकडी पडत आहे. तर एकीकडे रस्त्यात खड्डे दुसरी कडे जागोजागी बेशिस्त वाहन चालक आपली वाहन पार्क करत असल्याने वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त झाला असून लवकरात लवकर टोइंग व्हॅन सुरू करण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे. 

फेरीवाला विरोधात कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र रस्त्यात खड्डे खराब यामुळे आम्ही त्रस्त असताना बेशिस्त वाहन चालकांनी रस्त्यात वाहन पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पालिकेने रस्ते दुरुस्ती करावी तर वाहतूक पोलिसांनी टोइंग व्हॅनचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कल्याण प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांनी केली आहे.

टोइंग व्हॅनच्या ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने टोइंग व्हॅन बंद असली तरी वाहतूक पोलिस कर्मचारी मार्फत कारवाई सुरू आहे. मात्र या आठवडाभरात अत्याधुनिक टोइंग व्हॅन वाहतूक पोलिसांच्या ताप्यात दाखल होणार असल्याने बेशिस्त वाहन चालकावरील कारवाईला गती येईल अशी माहिती कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

Web Title: Kalyan news police toeing van