दिव्याच्या थांब्यावरून सेना भाजपमध्ये श्रेयवादाचे राजकारण

मयुरी चव्हाण काकडे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दादर सावंतवाडी या गाडीला यावर्षीही थांबा मिळावा म्हणून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे यंदाही या गाडीला दिवा येथे  थांबा देण्यात आला आहे. 
- अमर पाटील, शिवसेना नगरसेवक, दिवा 

डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. मात्र, या थांब्याच्या श्रेयावरून सेना आणि भाजप या दोन्ही पक्षात सध्या कलगीतुरा रंगला आहे.

दिवा तसेच कल्याण, अंबनरनाथ, बदलापूर आदी परिसरात कोकणवासीयांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सवाच्या काळात  येथील चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. मात्र, ठाण्यापलिकडे राहणाऱ्या नागरिकांना कोकणात जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी थेट ठाणे स्थानकात जावे लागते.

गणेशभक्तांना होणारा हा त्रास काही प्रमाणात कमी होण्यासाठी दिवा येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दादर-सावंतवाडी या कोकणात जाणाऱ्या गाडीला दिवा येथे थांबा दिला आहे. या कामाचे श्रेय घेण्यावरून सेना आणि भाजपमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झाली आहे. सेनेचे पदाधिकारी दिवा थांब्याचे श्रेय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे असल्याचे सांगत त्यांचे आभार मानत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच भाजपा आमदार संजय केळकर यांच्यामुळेच दिव्याला थांबा मिळाल्याचे सांगत  त्यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. 

गतवर्षीही कोकणात जाणारी गाडी गणेशोत्सवाच्या काळात दिवा येथे थांबताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेश प्रभू, आमदार केळकर यांचे फोटो असलेला फलक फलाटावर झळकवला होता. तर सेनेचे पदाधिकारीही भगवे झेंडे घेऊन रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दादर सावंतवाडी या गाडीला यावर्षीही थांबा मिळावा म्हणून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे यंदाही या गाडीला दिवा येथे  थांबा देण्यात आला आहे. 
- अमर पाटील, शिवसेना नगरसेवक, दिवा 

गतवर्षीही या गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला होता. आमदार केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे सेनेने उगाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.
- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना तथा भाजपा पदाधिकारी 

Web Title: kalyan news railway schedule in diva