टिटवाळा ते कसारा रेल्वेसेवा तब्बल 84 तासांनंतर पूर्ववत

रविंद्र खरात
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

रेल्वे प्रशासन मार्फ़त सत्कार
वेळप्रसंगी मेलगाडीचा ब्रेक दाबुन शेकडो प्रवासी वर्गाचा जीव वाचविल्या प्रकरणी त्या मेल गाडीचे लोकोपायलट विरेंद्र सिंग आणि त्यांचा सहकारी अभय कुमार पाल यांचा रेल्वे प्रशासनामार्फ़त आज सत्कार करण्यात आला.

कल्याण : तब्बल 84 तासांनंतर टिटवाळा ते कसारा रेल्वे मार्ग सुरळीत केल्याबद्दल रेल्वे प्रशासन अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन मात्र पुढे अश्या घटना घडू नये यासाठी उपाय योजना करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांच्याकडे केली आहे. 

मध्य रेल्वेच्या वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानक दरम्यान मुसळधार पाऊस सुरु असताना रेल्वे मार्गावर माती वाहून आली होती. तर काही ठिकाणी रेल्वे रुळाच्या खालील माती वाहून गेली होती. दुरांतो एक्सप्रेसच्या लोको पायलट विरेंद्र सिंग आणि त्यांचे सहाय्यक अभय कुमार पाल यांच्या लक्षात येताच त्यांनी मेल गाडीचे ब्रेक दाबले आणि ते मेलगाडीचे 9 डबे रुळावरुन घसरले. मंगळवार सकाळपासून टिटवाळा ते कसारा दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.

हा रेल्वे मार्ग पूर्वरत करण्यासाठी मध्य रेल्वेचे जीएम डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल सहित, रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय आयुक्त सचिन भालोदे, कल्याण रेल्वे पोलिस, जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, ए के सींगसहित रेल्वेचे शेकडो कर्मचारी 36 तासाहुन अधिक काळ घटनास्थळी थांबुन रेल्वे सेवा पूर्व पदावर आणण्यासाठी झटत असून त्यांच्या मदतीसाठी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी राहुल दोंदे, सचिन घेगडे, महेश तारमाळे, सचिन जाधव आदीही होते. दरम्यान 36 तासानंतर तांत्रिक काम पूर्ण झाले. मात्र रेल्वे मार्गावर वारंवार पड़त असलेल्या पावसाने आजुबाजुची माती पुन्हा रेल्वे मार्गावर येत होती. तर, रेल्वे मार्गाखालील परिसर दलदल निर्माण झाल्याने पुन्हा लोकल सुरु करण्यास अड़चण निर्माण होत होती. त्यामुळे त्या परिसरामध्ये सरंक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि काम पूर्ण झाल्याने आज सकाळी तब्बल 84 तासांनंतर टिटवाळा ते कसारा लोकल सेवा सुरु केल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

याप्रकरणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले. मात्र पुढे अशा दुर्घटना होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणी करण्यात आली. 

रेल्वे मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा लावावे, कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे रुग्णालय सुरु करावे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर रुग्ण वाहिका उपलब्ध कराव्या, असे अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्त गाड़ी मधील प्रवासी वर्गाला मदतीचा हात द्या मात्र अनेक रेल्वे स्थानक मधील प्रवासी वर्गाला ही पर्यायी प्रवासी वाहतुक उपलब्ध करून द्यावे. रेल्वे स्थानकामध्ये आपत्कालीन स्थितिमध्ये स्पीकर मार्फ़त प्रवासी वर्गाला माहिती द्यावी. पावसाळ्यात तांत्रिक विभाग मार्फ़त दुरुस्ती आणि रेल्वेच्या पोलिस आणि सुरक्षा बल मार्फ़त वेळोवेळी गस्त घालावी. कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान तिसऱ्या मार्गाचे काम सुरु असून अनेक ठिकाणी डोंगर खोदल्याने रेल्वे मार्ग असुरक्षित झाला आहे. त्याचा त्वरित सर्वे करावा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केली असून लवकरच रेल्वे अधिकारी वर्गाची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे प्रशासन मार्फ़त सत्कार
वेळप्रसंगी मेलगाडीचा ब्रेक दाबुन शेकडो प्रवासी वर्गाचा जीव वाचविल्या प्रकरणी त्या मेल गाडीचे लोकोपायलट विरेंद्र सिंग आणि त्यांचा सहकारी अभय कुमार पाल यांचा रेल्वे प्रशासनामार्फ़त आज सत्कार करण्यात आला.

Web Title: Kalyan news Titwala to Kasara railway start