कल्याण स्थानकातील सॅटीस प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सॅटीस प्रकल्पाला राज्य परिवहन महामंडळाकडे नाहरकत दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला दाखला देण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली.

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सॅटीस प्रकल्पाला राज्य परिवहन महामंडळाकडे नाहरकत दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला दाखला देण्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एकूण 425 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला रेल्वेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. 

कल्याण स्थानकावर परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पासाठी 425 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. यातील केंद्र आणि राज्य सरकारचे 285 कोटी यापूर्वीच जमा झाले आहेत. स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी मार्च महिन्यात राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडे या विषयावर सादरीकरण केले होते. त्या वेळी तो विषय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर मांडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार शनिवारी सह्याद्री अतिथिगृहात कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी रावते यांच्यासमोर सादरीकरण केले. या वेळी त्यांच्यासोबत महापौर राजेंद्र देवळेकर, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे तरुण जुनेजा, तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 

स्कायवॉकमध्ये होणार बदल 

बस वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन या नवीन प्रकल्पात ही वाहतूक वेगळी केली जाणार आहे. बैलबाजार ते सुभाष चौक परिसरापर्यंत फ्लॉयओव्हर बांधण्यात येणार आहे. सध्याच्या स्कायवॉकमध्ये काही बदल करण्यात येतील. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी डेपो तसेच रेल्वेच्या जागेचा वापर पार्किंगसाठी केला जाईल. 

Web Title: Kalyan Rail Station satis project partially sanctioned