नगरसेविकेच्या मुलीची हत्या करणाऱया जावयाला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

सात महिन्यांपासून राजेंद्र याचे पत्नी वैशालीसोबत वाद सुरू होते

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून कल्याणच्या शिवसेना नगरसेविकेच्या विवाहित मुलीची हत्या करणाऱया आरोपी जावयाला न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उल्हासनगरच्या हद्दीत झालेली ही हत्या नगरसेविकेच्या जावयानेच केल्याचे उघड झाल्याने हिल लाइन पोलिसांनी त्याला अटक केली होती.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका विमल भोईर व पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेले वसंत भोईर यांच्या मुलीचा विवाह मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडी गावातील राजेंद्र पाटील यांच्या सोबत झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. सात महिन्यांपासून राजेंद्र याचे पत्नी वैशालीसोबत वाद सुरू होते.

राजेंद्र याने याच वादातून शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भांडणात कोयत्याने वैशालीची हत्या केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मोहन कंदारे यांनी राजेंद्रला अटक केली असून कोयता जप्त केला आहे.

हत्येचे खरे कारण गुलदस्त्यातच
राजेंद्र हा माळकरी असून तो निर्व्यसनी असताना त्याने क्रूरपणे वैशालीची हत्या का केली याचे कारण गुलदस्त्यात आहे. वैशाली हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan Shivsena Corporator''s girls murder by her husband