झोपड्यांसाठी कांदळवनाची कत्तल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मालाड - मुंबईत अनेक ठिकाणी काही भूमाफियांकडून खाडी व नाल्यालगत असलेले कांदळवन तोडून तेथे झोपड्य उभारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मालवणीतील एव्हरशाईननगर येथून वाहणाऱ्या मुख्य नाल्यालगतचे कांदळवन नष्ट करून भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात येत आहेत. या बांधकामाकडे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

मालवणीतील मुख्य नाल्यावरून एव्हरशाईननगर व लगून रोडला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या पुलामुळे मार्वे रोड व एव्हरशाईननगर येथून मुख्य नाल्यावरील हा पूल ओलांडला की अवघ्या काही मिनिटातच लिंक रोडला पोहोचणे शक्‍य होणार आहे. तसेच नाल्याच्या बाजूला आलेल्या कांदळवनातून टाटा पॉवरच्या विजेच्या तारा गेल्याने या परिसराकडे फारसे कोणाचे लक्ष नसते, ही बाब लक्षात घेऊन मालवणीतील काही भूमाफियांनी कांदळवन तोडून तेथे बेकायदा झोपड्या उभारण्यास सुरुवात केली आहे. 

या झोपड्या सहा ते सात लाखांमध्ये विकल्या जात आहेत. या झोपड्यांमध्ये वीज असून, त्यांना डिश टीव्हीसह अन्य कनेक्‍शनही मिळाले आहेत. नाल्यालगत बांधण्यात येत असलेल्या झोपड्यांमुळे कांदळवनाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. परिणामी या झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. भूमाफियांना स्थानिक राजकारण्यांचे अभय असून पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. 

कांदळवन तोडून नाल्यात बांधण्यात येत असलेल्या झोपड्यांसदर्भात संबंधित विभागाकडून अहवाल मागवला आहे. अहवाल येताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- संजोग कबरे, सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग

Web Title: kandal forest cut for slum