भिवंडी दुर्घटनाः कंगनाचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल

पूजा विचारे
Thursday, 24 September 2020

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या दुर्घटनेची तुलना कंगनानं पुलवामा चकमकीसोबत केली आहे.

मुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या दुर्घटनेची तुलना कंगनानं पुलवामा चकमकीसोबत केली आहे.  माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं कंगनाने म्हटलंय. 

कंगनानं ट्विटरच्या माध्यातातून ही टीका केली आहे. कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित. अभिनेत्रीनं ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलंय. 

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण 

भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल नगर भागातील जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढत असून 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सदर ठिकाणी रात्री पासून दुर्गंधी पसरण्यास सुरवात झाल्याने सुरक्षितता म्हणून सदर भागात तातडीने जंतुनाशक औषध फवारणी आणि निलगिरी औषध फवारणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. मिलिंद भोईर यांनी घटनास्थळी दिली. 

घटनास्थळी सुरु असलेल्या बचाव कार्यात सतत पाऊस पडत असल्याने एनडीआरफ, टीडीआरफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता आपत्ती व्यवस्थापनानं बचावकार्य थांबवलं आहे.

Kangana Ranaut attack bhiwandi building collapse uddhav thackeray bmc sanjay raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut attack bhiwandi building collapse uddhav thackeray bmc sanjay raut