नवा वादः कंगना शेतकऱ्यांना म्हणाली दहशतवादी, काँग्रेसचा आरोप

पूजा विचारे
Monday, 21 September 2020

कंगनानं कृषी विधेयकांवरुन एक ट्विट केले आहे. या नव्या ट्विटमुळे कंगना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या ट्विटनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत बरीच चर्चेत आहे. आता तिनं पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. आता कंगनानं कृषी विधेयकांवरुन एक ट्विट केले आहे. या नव्या ट्विटमुळे कंगना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या ट्विटनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.

कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.  त्यात हे आंदोलन चिघळत असतानाच कंगनाने या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्यानं तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं. 

या ट्विटमध्ये एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार आहे. शेतीमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. बळीराजाच्या साह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आणि बळीराजाच्या पुढील पिढ्यांचं जीवन समृद्ध करण्याचा आमचा हेतु राहणार असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं.  त्यानंतर हे ट्विट अॅम्बेड करत कंगनानं मतप्रदर्शन केलं आहे.

केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्विट रिट्विट केलं आहे. त्यावर या ट्विटमध्ये कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

 

कंगनानं ट्विटमध्ये काय म्हटलं, पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे, असा सवाल  उपस्थित करत कंगना पुढे म्हणाली की, तसेच हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAAला विरोध केला होता. सीएएविरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही, असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आता कंगनाच्या या वक्तव्यावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. कंगना राणावत आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली. यासाठी मोदी सरकार आणि भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. मोदी सरकारने दिलेली वाय श्रेणी सुरक्षा आणि पाठिंब्यामुळेच भाजपची ही 'झांसे की रानी' इतकी शेफारली आहे. आम्ही भाजप आणि कंगना या दोघांचाही निषेध करत आहोत', अशा शब्दांत सचिन सावंत यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

kangana ranaut calls farmers terrorists congress sachin sawant criticized


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut calls farmers terrorists congress sachin sawant criticized