आज कंगना मुंबईत येतेय! येण्यापूर्वी अभिनेत्रीचा सूर मवाळ, केलेल्या ट्विटची चर्चा

पूजा विचारे
Wednesday, 9 September 2020

अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबईत येणार आहे. कंगना राणावतची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा विमान प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंगना हिमाचलमधल्या मंडीहून चंदीगडकडे रवाना झाली.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबईत येणार आहे. कंगना राणावतची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा विमान प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंगना हिमाचलमधल्या मंडीहून चंदीगडकडे रवाना झाली असून ती दुपारपर्यंत चंदीगडहून मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या प्रवासादरम्यान कंगनानं एक ट्विट केलं आहे. 

मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान देणाऱ्या कंगनाचा या ट्विटमध्ये सूर मवाळ होताना दिसला आहे. तिनं ट्विटमध्ये लिहिलं की, राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी. 

 

कंगनानं मुंबई पोलिस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे.  शिवसेनेनं तिच्याविरोधात जोडेमारो आंदोलनही केलं होतं. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येतोय. याआधी कंगनानं खुलं आव्हानचं दिलं होतं. त्या वादग्रस्त ट्विटमध्ये ती म्हणाली होती की,अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.

कंगनानं आणखी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये ती म्हणते की, मुंबई हे माझं घर आहे. महाराष्ट्रानं मला सर्वकाही दिलंय हे मान्य आहे. पण मी देखील महाराष्ट्राला एका अशा कन्येची भेट दिली आहे, जी मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही सांडू शकते. जय महाराष्ट,' असं तिनं म्हटलं आहे.

 

१२ वर्षांची असताना मी हिमाचल प्रदेश सोडून चंदीगड येथील हॉस्टेलला गेले. तिथून दिल्ली आणि सोळाव्या वर्षी मुंबईत आले. तेव्हा काही मित्रमंडळींनी सांगितलं की मुंबईत तोच राहू शकतो, ज्याच्यावर मुंबादेवीची कृपा आहे. त्यानंतर आम्ही सगळे मुंबादेवीच्या दर्शनाला गेलो. माझे काही मित्र परत गेले, पण मुंबादेवीनं मला स्वीकारलं,' असं तिनं आणखी एका दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय. 

 

मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्या येणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तणावपूर्ण स्थिती आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Kangana Ranaut Coming Mumbai Today 9th September Kangana traveling tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut Coming Mumbai Today 9th September Kangana traveling tweet