कंगना भडकली, सकाळी सकाळी ट्विट करत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पूजा विचारे
Thursday, 10 September 2020

अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सकाळी सकाळी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सकाळी सकाळी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची सोनिया सेना झाली आहे, अशा शब्दात कंगनानं टीका केली आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईत परतल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. त्यानंतर काही तास उलटल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका, असे ट्वीट कंगनाने केलं आहे. 

 

 

बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.  पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. 

कंगनानं सकाळी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं एक फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये तिने इशा योगा सेंटरमधील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच हा आपला सर्वाधिक आवडता फोटो असल्याचं म्हटलं आहे.

 

कंगना या ट्विटमध्ये म्हणाली की, हा माझा सर्वात आवडता फोटो आहे. हा माझ्या इशा योग सेंटरमध्ये काढण्यात आला. त्यावेळी काहीही ठरलेलं नव्हतं, सहजपणे हा फोटो काढला होता. मात्र, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी सुंदरपणे स्मित हास्यासह दिसत आहे.

Kangana Ranaut Tweet Criticise CM Uddhav Thackeray Shivsena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut Tweet Criticise CM Uddhav Thackeray Shivsena