भाजप दहा तोंडांचा रावण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपूर्वक देशात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. सत्ताधारी पुरस्कृत द्वेष पसरवून हत्या घडवल्या जात आहेत. भाजप हा दहा तोंडांचा रावण आहे, असा हल्लाबोल विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी केला.

मुंबई - निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपूर्वक देशात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. सत्ताधारी पुरस्कृत द्वेष पसरवून हत्या घडवल्या जात आहेत. भाजप हा दहा तोंडांचा रावण आहे, असा हल्लाबोल विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी केला.

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई प्रेस क्‍लबतर्फे राजकीय आणि सामाजिक विषयांवर विविध विचारांच्या नेत्यांची चर्चासत्रे घेण्यात येणार आहेत. आज कन्हैया कुमार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. गौरी लंकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच आहेत. कर्नाटक पोलिसांनी आरोपींना अटक करण्याआधी महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींना घाईगडबडीत अटक केली. ही कारवाई यापूर्वी का झाली नाही, असा सवालही उपस्थित केला.

केंद्र सरकारकडे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाहीत. पेट्रोल महाग झाले तर त्यासाठी औरंगजेबला दोषी कसे धरणार? १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात; पण शेतकऱ्यांना पीक विमा देणाऱ्या कंपनीला १२ हजार कोटींचा नफा कसा काय होतो? राफेल खरेदीचे गूढ काय आहे. त्याची किंमत जाहीर न करण्यामागे कोणाचे हित आहे, असे प्रश्‍न उपस्थित करत केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न कन्हैया कुमार यांनी केला.

लोकशाही, पत्रकारितेची मूल्ये धोक्‍यात!
सत्तेशी संबंधित असणाऱ्यांचे माध्यमांमध्ये आर्थिक हितसंबंध तयार झालेले आहेत. त्यामुळेच लोकशाही आणि पत्रकारितेची मूल्ये धोक्‍यात असल्याचे दिसते. खरे-खोटे तपासून पाहणे, प्रश्‍न विचारणे पत्रकाराचे काम आहे; मात्र त्यांना त्यांचे काम करू दिले जात नाही. त्यांना धमकावले जाते. ही सर्वांत भयानक गोष्ट असल्याचे निरीक्षण कन्हैयाने या वेळी बोलताना व्यक्‍त केले.

Web Title: Kanhaiya Kumar attacked the BJP in mumbai