कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा योग्य नाहीच; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पुरावे सादर

तुषार सोनवणे
Wednesday, 14 October 2020

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका करून, हा निर्णय कसा चुकीचा आहे. याचे पुरावे दिले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुकच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेडची जागा बदलवून ती कांजूर मार्ग येथे हलवली असल्याचा निर्णय घोषित केला. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका करून, हा निर्णय कसा चुकीचा आहे. याचे पुरावे दिले आहेत.

फडणवीस यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याबाबत त्याचवेळी टीका केली होती. आता त्यांनी सलग काही ट्विट करीत, पुरावे सादर केले आहेत. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन्ही मार्गिकांसाठी एकच कारशेड असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली होती असे त्यांनी म्हटले आहे.

आरेची जागा आर्थिकदृष्ट्या किफातशीर होती. हा मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आरे ही एकमात्र जागा आहे. तो अधिक शाश्वत पर्याय असल्याचे ठाम मत फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. यासंबधी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीतीत अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षेतेखालील समितीने काही निरक्षणे नोंदवली आहेत. आरे कारशेडचे नियोजन करताना पर्यावरण रक्षणावर सर्वाधिक लक्ष देण्यात आले होते. कार्वबन उत्सर्जन कमी करणे, सौर उर्जेचे पॅनेल बसविणे, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर, एलईडी लाईट्सचा वापर असे नियोजन होते. या प्रकल्पाचा जेवढा उशीर होईल तेवढे कार्बन उत्सर्जन वाढणार आहे. त्यामुळे आरेमध्ये जी वृक्ष तोड होईल तिच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.

यासंदर्भात फडणवीसांनी आणखी माहिती देताना म्हटले आहे की, ' 2015 मध्ये महायुती सरकारने कांजूरमार्ग येथील जागेचा विचार केला होता. त्यासाठी लागणारा विलंब आणि जमिनीसंदर्भातील विविध कायदेशीर अडचणींमुळे कांजूरमार्गच्या जागेचा विचार मागे पडला होता. ही जागा अद्यापही विवादित आहे'

'कांजूरमार्गची जागा उपलब्ध झाल्यानंतर मेट्रो प्रकल्प कार्वान्वित होण्यासाठी 4.5 वर्ष लागणार आहेत. हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित होणार होता. कांजूरमार्गाच्या जमिनीची पोत पाहता, त्या ठिकाणी जागेचे स्थिरीकरण गरजेचे आहे. त्यालाच दोन वर्ष लागू शकतात. या निर्णयामुळे मेट्रो 3 चे प्रश्न तर सुटणार नाहीच परंतु मेट्रो 3 सह मेट्रो 6 अशा दोन्ही मार्गावरील फेऱ्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. कांजूरमार्ग भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो - 6 च्या कार्यान्वयात प्रचंड गुंतागुंत निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम मेट्रो 3 वरही होईल. शिवाय नुकसानही वाढेल. याप्रकल्पाच्या कार्यकक्षेत, कालावधीत होणारे बदल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे होणारा विलंब या संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकारलाच उचलावा लागणार आहे'. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे,  पर्यावरणासाठी संघर्ष करणार्‍यांचा मी सन्मानच करतो. पण, आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. पण, आता हेच पर्यावरणवादी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

-----------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanjurmarg is not suitable for a car shed Devendra Fadnavis presents evidence to CM